Breaking News

दखल- दीदी का बदलताहेत रणनीती?पश्‍चिम बंगालमध्ये डाव्या आघाडी व काँग्रेसची जागा आता भाजपनं घेतली आहे. भाजपचा विस्तार वाढतो आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डाव्यांना आणि काँग्रेसला संपविल्यामुळं आता तिथं उजव्यांचा स्पेस वाढला आहे. त्यामुळं ममता दीदींची डोकेदुखी वाढली असून भाजपचं वाढतं बळ रोखण्यासाठी त्या वेगळी व्यूहनीती आखत आहेत.

पश्‍चिम बंगालमध्ये तीन दशकांहून अधिक काळ डाव्यांची सत्ता होती. त्या वेळी काँग्रेस हा तिथला प्रमुख विरोधी पक्ष होता; परंतु काँग्रेसनं डाव्यांविरोधात कधीच खंबीर भूमिका घेतली नाही. परिणामी काँग्रस तिथून संपली. त्या वेळी ममता दीदी काँग्रेसमध्ये होत्या. त्यांना काँग्रेसचं हे डाव्यांविरोधातलं बोटचेपं धोरण आवडलं नाही. त्यांनी स्वतःचा तृणमूल काँग्रेस हा पक्ष काढला. अवघ्या एका दशकात त्यांनी पश्‍चिम बंगालची सत्ता डाव्यांच्या हातून हिसकावून घेतली. एवढंच नाही, तर त्यांनी डाव्यांना जशास तसं उत्तर द्यायला सुरुवात केली. डाव्यांची जशी दडपशाही होती, तशीच दडपशाही ममता दीदींच्या पक्षानं सुरू केली. मतदान केंद्र ताब्यात घेण्यापासून कशातच त्यांनी कसर केली नाही. पश्‍चिम बंगालमध्ये त्यांनी तृणमूलची पानं खोलवर रुजविली. ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतच्या सर्व निवडणुकांत त्यांनी यश मिळविलं. खरंतर विरोधी पक्ष असावा लागतो. तसा तो नसला, तर मग पोकळी निर्माण होते. अशी पोकळी मग अन्य कुणीतरी भरून काढीत असतो. पश्‍चिम बंगालमध्ये डाव्याचं आणि काँग्रेसचं उच्चाटन करणं आता ममता दीदींना महागात पडलं आहे. डावे आणि काँग्रेस सत्तेला आव्हान देऊ शकेल, अशी परिस्थिती नाही. त्यांचं आणखी खच्चीकरण होऊ द्यायचं नव्हतं. त्यांचं खच्चीकरण केल्यानं लोकांनी अन्य पर्यायाचा शोध घेतला. त्यांच्या या पर्यायाचा शोध भाजपजवळ येऊन थांबला. आक्रस्ताळेपणा आणि अतिआक्रमकपणा कधी कधी अंगलट येतो. ममता दीदींबाबत नेमकं तेच घडलं. भाजपनं हळूहळू विरोधी पक्षांची स्पेस भरून काढायला सुरुवात केली. आता तर स्थानिक तसंच अन्य निवडणुकांत भाजप दुसर्‍या क्रमांकावर पोचला. या पक्षानं ममतांच्या तृणमूल काँग्रेसपुढं आव्हान उभं केलं आहे. पाच खासदारांना भाजपनं गळाला लावलं, तर शंभर आमदार फोडण्याचा दावा भाजपनं केल्यामुळं तृणमूलच्या पोटात भीकेचा गोळा उभा राहिला आहे.
उत्तर प्रदेश, हिंदी भाषक पट्ट्यात भाजपच्या जागा कमी होणार आहेत. त्या जागा पश्‍चिम बंगालसारख्या राज्यातून भरून काढण्यावर भाजपनं भर दिला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्‍चिम बंगालवर जास्त भर दिला आहे. तेथील शारदा चिटफंड घोटाळ्याचा पक्षवाढीसाठी चांगलाच उपयोग करून घेतला आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग, अंमलबजावणी संचालनायासारख्या यंत्रणांना हाताशी धरून या प्रकरणातील तृणमूलच्या नेत्यांना ब्लॅकमेल करून भाजपत नेण्याचा सपाटा लावला आहे. योगी आदित्यनाथांसह अन्य नेत्यांना पश्‍चिम बंगालमध्ये आणून हिंदू मतांच्या धु्रवीकरणावर भर दिला जात आहे. पश्‍चिम बंगालमध्ये 29 टक्के मुस्लिम असून ती विभागली जाणार असताना हिंदू मतांचे धु्रवीकरण ममता दीदींना परवडणारं नाही. भाजपच्या रथयात्रा रोखण्यात त्यांना यश आलं असलं, तरी भाजपनं सुरू केलेला विस्तार रोखणं त्यांना जमलेलं नाही. नागरिकत्त्व विधेयकावरून भाजपनं मतांची बेगमी करायला सुरुवात केली आहे. स्थलांतरितांचा मुद्दा पश्‍चिम बंगालमध्ये महत्त्वाचा आहेच. अशा परिस्थितीत डाव्यांचं कमकुवत होणं, काँग्रेसचं अस्तित्व नसणं हे चांगलं नाही, हे ममता दीदींच्या लक्षात आलं आहे; परंतु डावे आणि काँग्रेससोबत उघड युती करता येत नाही, हे त्यांचं शल्य आहे. डाव्यांच्या मोर्चांना, मेळाव्यांना यायला कुणी तयार नसायचं. तृणमूलचे कार्यकर्ते त्यांना धमकावयाचे. हिंसाचार करायचे. त्यामुळं डाव्यांचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते घरातून बाहेर पडायलाच तयार नव्हते.आता मात्र तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी सबुरीची भूमिका घेतली आहे. काँग्रस, डावे हे आपला शत्रू नाहीत, तर खरा शत्रू भाजप आहे, हे त्यांना पटलं आहे. त्यामुळं मध्यंतरी कोलकत्ता इथं झालेल्या डाव्यांच्या रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाला. डावे, काँग्रेस, तृणमूल या सर्वांचा स्पर्धक भाजप आहे. आपसांत लढत राहिलो, तर भाजपचं आव्हान आणखी तीव्र होईल, याची जाणीव तिघांना आहे; परंतु तिघं एकत्र यायला अजून तयार नाहीत. तरीही ममता दीदींमध्ये आता थोडा बदल झाला आहे. त्या काँग्रेस आणि डाव्यांवर पूर्वीइतकी टीका करीत नाहीत, आरोप करीत नाहीत. त्यांनी आपला रोख आता फक्त भाजपकडं वळविला आहे. मार्क्सवादी कम्युनिष्ठ पक्षाला ममता दीदीनं थोडी मोकळीक दिली आहे. आपली ताकद दाखवून द्या, असंच जणू त्या अप्रत्यक्षरीत्या सांगत आहेत. तृणमूल, डावे आणि काँग्रेसमध्येच मतविभागणी झाली, तर ती भाजपच्या पथ्थ्यावर पडणारी आहे. तसं होऊ नये, यासाठीही आता ममता दीदी व्यूहरचना करीत आहेत.
पश्‍चिम बंगालमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मतांची टक्केवारी 17 होती. डाव्यांची टक्केवारी 43 वरून 29 टक्क्यांपर्यंत खाली आली. पोटनिवडणुकांतही हीच टक्केवारी कायम राहिली. डाव्यांचा आणि काँग्रेसचा मतदानातील हिस्सा कमी होऊन भाजपचा हिस्सा वाढणं तृणमूल काँग्रेसच्या हिताचा नाही. या दोन्ही पक्षांचा मतांचा हिस्सा किमान 25 टक्के असायला हवा. त्यासाठी आता ममता दीदींनीच ज्या जागांवर तृणमूलचे उमेदवार निवडून येऊ शकत नाहीत; परंतु डावे व काँग्रेसचे उमेदवार निवडून येऊ शकतात, तिथे मुद्दाम तृणमूलचे डमी उमेदवार द्यायला सुुरुवात केली आहे. दुबळा उमेदवार देऊन आपली ताकद अप्रत्यक्षरीत्या काँग्रेस आणि डाव्यांच्या मागं उभी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळं भाजपच्या उमेदवाराला परस्पर शह देता येऊ शकतो. जंगीपूरमधून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे चिरंजीव अभिजीत मुखर्जी आणि रायगंजमधून माजी केंद्रीय मंत्री प्रियरंजनदास मुन्शी यांच्या पत्नी दीपाशंकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात ममता दीदींनी मुद्दाम तृणमूलचे कमजोर उमेदवार दिले आहेत. दीदींच्या उपकाराची जाणीव ठेवून काँग्रेसनंही तृणमूलचे जिथे महत्त्वाचे उमेदवार आहेत, तिथं उमेदवार न देता तृणमूलला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. जादवपूर या महत्त्वाच्या जागेवर तृणमूल काँग्रेसनं चित्रपट अभिनेता मिमी चक्रवर्ती यांना उमेदवारी दिली आहे. तिथं काँग्रेसनं कुणालाच उमेदवारी दिली नाही. या जागेवरून पूर्वी ममता दीदी निवडणुकीच्या रिंगणात असायच्या. लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चटर्जी यांनीही या मतदारसंघाचं प्रतिनिधित्त्व केलं आहे. तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुब्रत मुखर्जी बांकुरा लोकसभेच्या जागेवरून निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसनं उमेदवार दिलेला नाही. भाजपचं आव्हान रोखण्यासाठी परस्परांना आतून मदत करण्याची दीदींची ही व्यूहरचना आहे. उघडउघड आघाडी केली, तर त्याचा फायदाही भाजपला होऊ शकतो. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत भाजपला फायदाच होऊ द्यायचा नाही, अशा पद्धतीनं ममता दीदीचं पश्‍चिम बंगालमधील राजकारण सुरू आहे. राहुल गांधी यांच्या पश्‍चिम बंगालमधील सभेला झालेली गर्दी पाहता काँग्रेस तिथून भुईसपाट झालेली नाही, हे लक्षात येतं. काँग्रेस आणि डाव्यांचा प्रतिसाद वाढला, तरी ते तृणमूलला आव्हान नाही, हे दीदींनी जाणलं आहे.