Breaking News

भलरीच्या तालावर दुमदुमताहेत शिवारे


खटाव, (सदानंद जगताप/ लोकमंथन वृत्तसेवा) : खटावसह परिसरातील दरूज, दरजाई, जाखणगाव, खातगुण, भांडेवाडी, धारपुडी आदी गावांमध्ये रब्बी हंगामातील पिक काढणीस खटाव तालुक्यात जोमात सुरूवात झाली आहे. पिक काढताना ठिकठिकाणच्या शिवारांमध्ये घुमणार्‍या भलरींच्या सुरांनी शिवारे दुमदुमताना दिसत आहेत. भलरी गीते आणि पिक काढणीच्या आनंदामुळे परिसरातील गावांमध्ये आणि शेतकर्‍यांच्या घराघरांत उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. 

खटाव तालुक्यात चालु वर्षी रब्बी हंगामासाठी आवश्यक ठरणारा पाउस वेळेवर झालाच नाही. तर काही ठिकाणी अत्यंत अपुरा झाला. या परिसरात ज्वारी हेच मुख्य पिक असले तरी ज्वारीच्या पेरणीवेळी अपुर्‍या ओलीमुळे मनात इच्छा असूनही शेतकर्‍यांना पुरेसा पीकपेरा घेता आला नाही. काही शेतकर्‍यांनी तर गहू, हरबरा ही पिके अक्षरश: तिंबवून (जमिनीला पाणी देवून) पेरे केले.

मध्यंतरीच्या कालावधीत अचानक प्रमाणाबाहेर वाढलेली थंडी गहू, हरभर्‍यास पोषक असली तरी शीतलहर आणि अधून मधून पडणार्‍या धुक्यांमुळे रब्बी हंगामातील ज्वारी पिकांचे उत्पादनावर त्याचा विपरित परिणाम झाला. प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीमुळे ज्वारीचे उत्पादन यंदा कमालीचे घटले आहे. त्यातच ज्वारीच्या काढणीसाठी पुरूष कामगारास 500 रूपये, महिला कामगारांना 350 रूपये दरदिवसाची मजूरी द्यावी लागत आहे. तर ज्वारीच्या मळणीसाठी प्रतीक्विंटलला शंभर रूपये, हरभर्‍यास 350 तर गव्हासाठी 300 रूपये आकारले जात आहेत. या परिसरातील धारपुडी येथील जाणकार व प्रगतीशील शेतकरी मारूती भिकोबा सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या स्थानिक बाजारपेठेमध्ये तीन ते साडेतीन हजार रूपये ज्वारीचा प्रती क्विंटलचा दर असला तरी, जाल वर्षात घटलेले उत्पादन लक्षात घेता हा दर आणखी एक ते दीड हजाराने वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. खटाव परिसरात सध्या रब्बीची काढणी जोमात सुरू असून जागोजागी भलरी गीतांच्या तालावर पिकाची काढणी चालली असल्याचे चित्र दिसत आहे. भलरीच्या सुरावटींनी परिसरातील शिवारांमध्ये चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले आहे.