Breaking News

अझहरवरून भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली; भाजपचा राहुल गांधींना टोला; चीनला समजवण्याचा सल्लानवीदिल्लीः पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्या पाकिस्तानमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये पुन्हा एकदा चीनने खोडा घातला. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात चीनने पुन्हा नकाराधिकाराचा वापर केला. दरम्यान याच मुद्द्यावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे, तर परराष्ट्र धोरण हे ट्वीटरवर ठरत नसून तुम्ही चीनला समजावायला हवे होते, अशी टीका केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राहुल यांच्यावर केली आहे.

‘राहुल गांधीजी ट्विटरवर परराष्ट्र धोरण ठरवता येत नाही. परराष्ट्र कूटनीती हा गंभीर विषय असून ट्विट करत ते निश्‍चित करता येत नाही’, अशी टीका प्रसाद यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी ट्विट केले होते, की‘दुबळे पंतप्रधान चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना घाबरतात. चीन जेव्हा कधी भारताविरोधात कारवाई करतो, तेव्हा एक शब्दही तोंडाबाहेर येत नाही’. प्रसाद यांनी राहुल यांना राजनैतिक बाबींवर प्रतिक्रिया देताना कसे वागावे किंवा कसे बोलावे, याची माहिती नसल्याची टीका केली आहे. ‘राहुल जास्त वाचन करत नाहीत. आम्हाला वाटले होते, की काँग्रेस पक्षाला इतका अनुभव असताना परराष्ट्र गोष्टींसंबंधी त्यांना योग्य सल्ले दिले गेले असावेत’, असा टोला प्रसाद यांनी लगावला.

संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असताना 2009 मध्ये चीनने अशाप्रकारे अडथळा आणला होता. त्या वेळी तुम्ही काहीच का बोलला नाहीत, असा प्रश्‍न प्रसाद यांनी विचारला. राहुल गांधींचे ट्विट आज पाकिस्तानात हेडलाइनला असेल, असेही ते म्हणाले.


चीनच्या चांगल्या संबंधाचा फायदा का नाही घेतलात?
राहुल गांधी आपले चीनसोबत चांगले संबंध असल्याचा दावा करतात. डोकलाम वाद सुरू असताना तुम्ही चीनच्या अधिकार्‍यांना भेटलात. मानसरोवर दौर्‍यावेळी चिनी अधिकार्‍यांना तुम्हाला भेटायचे होते. मग मसूद अझहरविरोधात भूमिका घेण्यासाठी तुम्ही आपल्या संबंधांचा फायदा का घेतला नाही, अशी विचारणा प्रसाद यांनी केली.