Breaking News

यशवंतराव गडाखांच्या घराची मुलाच्या अटकेसाठी झडती


नगर / प्रतिनिधीः
नगरमधील माजी खासदार, ज्येष्ठ नेते आणि ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव नेवाशाचे माजी आमदार शंकरराव गडाख यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी गडाखांच्या घराची झडती घेतली. शेतकरी आंदोलनाच्या वेळी दाखल गुन्ह्यात शंकरराव यांना न्यायालयाचे अटक वॉरंट बजावण्यासाठी पोलिस गेले होते. पोलिसांनी घराची झडती घेऊन त्रासदायक वर्तन केल्याचा आणि त्यांच्यावर राजकीय दबाव असल्याचा आरोप गडाख कुटुंबीयांनी केला आहे. माजी आमदार गडाख बाहेरगावी गेले होते. झडतीचा प्रकार झाला नसल्याचा पोलिसांचा दावा आहे.

नेवासे तालुक्यातील वडाळा भैरोबा येथे गडाख यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आंदोलन झाले होते. त्यामध्ये गडाख यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात हे प्रकरण सुरू आहे. त्यामध्ये गडाख यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात आले आहे. 16 मार्चला गडाख यांनी न्यायालयात हजर करावे, असा आदेश न्यायालयाने दिला होता. हे वॉरंट बजावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार मोठ्या फौजफाट्यासह गडाख यांच्या नगरमधील निवासस्थानी गेले. शंकरराव गडाख घरी नसून पुण्याला गेल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख हेही तेथे होते. गडाख कुटुंबीयांनी सांगूनही पोलिसांनी घरात जाऊन झडती घेतली.

सुमारे 20 ते 25 पोलिसांनी घरी येऊन झडती घेतली. प्रत्येक खोली तपासली. घरात महिला, लहान मुले हे सर्व बघून गडबडून गेले. शंकरराव काही कामानिमित्त पुण्यात आहेत. त्यामुळे तुम्ही अशी झडती घेऊ नका, अशी विनंती माझे बंधू विजय व मी पोलिसांना केली; पण तरी त्यांनी झडती घेतली. सोनई - शिंगणापूर येथेही प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यात आपल्याला पोलिसांना दोष द्यायचा नाही. शंकररावांनी हे आंदोलन पाटपाण्याच्या व शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसाठी केले होते. हा काही मोठा गुन्हा नाही. तरीही पोलिस यंत्रणा एखाद्या मोठ्या गुन्हेगाराला अटक करण्यासारखी यंत्रणा राबवत आहे, असा आरोप प्रशांत गडाख यांनी केला. दरम्यान, आज न्यायालयात झालेल्या सुनावणीच्यावेळी पोलिसांनी माजी आमदार गडाख मिळाले नसल्याचा अहवाल दिला. त्यानंतर न्यायालयाने त्यांना हजर राहण्यासाठी मुदत वाढवून दिली.

इतका आकस पहिल्यांदाच

गेल्या साडेचार वर्षांत मुळा उद्योग समूहातील विविध संस्थांच्या चौकशा लावून एखाद्याला पुढे करून स्वतःचा वैयक्तिक, राजकीय स्वार्थ साधत तालुक्यातील लोकप्रतिनिधी संस्थात्मक, विकासात्मक कामात न रमता अशा कामात वेळ खर्च करत आहे, हे तालुक्याचे दुर्दैव आहे. गडाख कुटुंबातील एका -एकाला जेलमध्ये घालीन, असे जाहीर भाषणच विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी केलं होते. गडाख कुटुंबाने अनेकांशी राजकीय लढाया केल्या; पण इतका आकस पहिल्यांदा हा तालुका अनुभवत आहे, असे आरोप युवा नेते प्रशांत गडाख यांनी भाजप आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे नाव न घेता त्यांच्यावर केले.