Breaking News

मल्हारपेठच्या वाचनालयात महिलादिन कार्यक्रम साजरा


पाटण / (प्रतिनिधी) : मल्हारपेठ येथील सहयाद्री वाचनालयात काल महिला दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने महिलांबाबतच्या विविध ग्रंथांचे प्रदर्शन व महिला कर्मचार्‍यांचाही सत्कार झाला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य महिला लोक आयोगाच्या कार्याध्यक्ष व लेक लाडकी अभियानच्या प्रवर्तक ऍड. वर्षा देशपांडे, ऍड. शैला जाधव, माया पवार, स्वाती बल्लाळ, कैलास जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. वाचनालयातील कर्मचारी ग्रंथपाल शुभांगी पवार, सुजाता चव्हाण, रुपाली शेटे तसेच इतर महिलांचा या प्रसंगी सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला.

या वेळी महिला सक्षमीकरण व सबलीकरण तसेच स्त्री भ्रूणहत्या, लेक वाचवा अभियान, महिलांचा विकास, आदर्श महिलांचे कार्य व चरित्रगाथा आदी विषयांवरील ग्रंथांच्या प्रदर्शनाचे उदघाटन ऍड. वर्षा देशपांडे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. उदय वनारसे यांनी स्वागत केले. वाचनालयाच्या कार्याचा आढावा कार्यवाह दादासाहेब पवार यांनी घेतला. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रदीप देसाई यांनी करून दिला. या प्रसंगी राजेंद्र चव्हाण, जे. एम. पवार, डी. के. पवार, पोलीस पाटील जगन्नाथ पाटील, प्रवीण चव्हाण, अर्जुन दशवन्त, प्रीती पवार, प्रतीक पवार आदी मान्यवर तसेच वाचक सभासद व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सौ. शुभांगी पवार यांनी आभार मानले.