हिंगणगावच्या शेतकर्‍यांचे उपोषण सातव्या दिवशी मागे


सातारा / प्रतिनिधी : बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करून हिंगणगाव (ता. फलटण) येथील शेतकर्‍यांची 242 एकर जमीन फसवणूक करून हडपणार्‍यांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले 21 खातेधारकांचे उपोषण सातव्या दिवशी मागे घेण्यात आले. स्वाभिमानी रामोशी महासंघाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सौ. प्रियाताई नाईक व संस्थापक सदाशिवराव नाईक यांच्या हस्ते लिंबू सरबत घेवून आंदोलनकर्त्यांनी या उपोषणाची सांगता केली.

हिंगणगाव येथील जुन्या सर्व्हे क्रमांक 356 ते 377 आणि शेतजमिनीचे नवे गट क्रमांक 1443 ते 1627 दरम्यानची रामोशी समाजातील खातेदारांची 142 एकर शेतजमिन गावातील व बाहेरील काही व्यक्तींनी बोगस कुलमुखत्यार करून हडपली होती. संबंधित शेतकर्‍यांच्या अज्ञान व भोळेपणाचा गैरफायदा घेत त्यापैकी काही जणांना हातशी घेत आणि चुकीची माहिती देवून संबंधितांनी त्यांची फसवणुक केली होती. वेळोवेळी याबाबत शासनदरबारी दाद मागूनही हा प्रश्न मार्गी लागत नव्हता. आणि त्यामुळे या जमिनीच्या मूळ मालक असणार्‍या गोरगरीब शेतकर्‍यांची फरफट होत होती. जमीनीचे मालक असूनही त्यांच्यावर रोजगार आणि रोजी रोटीसाठी भटकंती करण्याची वेळ येवून ठेपली होती. त्यामुळे सात मार्चपासून संबंधित शेतकर्‍यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केेले होते. मात्र जिल्हा प्रशासनाकडून त्याची काहीही दखल घेतली जात नव्हती. उपोषणकर्ते सर्वच आंदोलन वयोवृध्द असल्याने आणि त्यांना रक्तदाब, मधुमेह आदी आजारांनी घेरल्याने उपोषण सहन न झाल्याने तिसर्‍या दिवसांपासूनच सात ते आठ जणांची प्रकृती खालावली होती. मात्र तरीही या उपोषणाची दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे स्वाभिमानी रामोशी महासंघाच्या राज्याध्यक्षा सौ. प्रियाताई नाईक यांनी याप्रश्नी मध्यस्थी केली व जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात याबाबत आंदोलकांच्या शिष्ठमंडळासमवेत बैठक घेतली. त्यावेळी विधी व प्राधिकरण कार्यालयास दूरध्वनीद्वारे कागदपत्रांची पडताळणी करून योग्य तो अहवाल तातडीने देण्याचे आदेश दिले. याशिवाय सीबीआय चौकशी करण्यासाठी संबंधित यंत्रणेस सूचना देण्याचे आश्वासनही जिल्हाधिकार्‍यांनी दिले. त्याबाबत सकारात्मकता वाटल्याने आज सातव्या दिवशी हे आंदोलन मागे घेण्यात आले.

स्वाभिमानी रामोशी महासंघाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सौ. प्रियाताई नाईक व संस्थापक सदाशिवराव नाईक यांच्या हस्ते लिंबू सरबत घेवून वयोवृध्द आंदोलनकर्त्यांनी या उपोषणाची सांगता केली. जिल्हा प्रशासन आणि प्रियाताई नाईक यांच्यामुळेच आमचा प्रश्न मार्गी लागेल, अशी आम्हास खात्री वाटते, अशी प्रतिक्रिया सुरेश रामा जाधव, भरत विष्णू जाधव, पमाबाई साहेबराव जाधव, सखूबाई हणमंत जाधव, मालन संबत जाधव, मुक्ताबाई मल्हारी जाधव आदी सर्वच आंदोलनकर्त्यांनी उपोषणाची सांगता करताना व्यक्त केली.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget