Breaking News

‘स्वाभिमानी’ला हव्यात दोन जागा; राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपल्या वाट्याची एकएक जागा देणार


मुंबई / प्रतिनिधीः
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजप-शिवसेनेची साथ सोडून आघाडीशी मैत्री करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आघाडीकडे किमान दोन जागांची मागणी केली आहे. ही मागणी मान्य होण्याची चिन्हे आहेत. सांगली किंवा वर्ध्याची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली जाण्याची शक्यता आहे.

गेल्या निवडणुकीत भाजपसोबत युती केल्यानंतर भाजपने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला तीन जागा दिल्या होत्या. आता काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यासाठी त्यांनी आम्हाला किमान दोन तरी जागा द्याव्यात, अशी मागणी शेट्टी यांनी केली आहे.

त्याअगोदर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी शेट्टी यांची भेट घेतली होती. युतीच्या घटक पक्षांची एकत्रित मोट बांधून चौथी आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची त्यांची तयारी होती; परंतु या आघाडीत सदाभाऊ खोत यांना घेणे तसेच आघाडीचा फायदा अप्रत्यक्षरीत्या भाजपला होणे शेट्टी यांना मान्य नव्हते. त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुरुवातीपासून शेट्टी यांच्यांशी चांगला समन्वय ठेवला होता. त्यांनी त्यांच्या वाट्याची हातकणंगले मतदारसंघाची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली आहे.
सुरुवातीला शेट्टी यांनी पाच जागांची मागणी केली होती. त्यानंतर तीन जागांवर ते ठाम होते; परंतु आता दोन जागांवर ते आले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन जागा सोडणे आघाडीला शक्य आहे. शिवाय शेट्टी यांचा आक्रमक सूर काहीसा नरमला आहे. दोन जागा मिळाल्या नाहीत, तरीही भाजपसोबत जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. अर्थात ते दोन्ही काँग्रेसपासून अलिप्त राहतील; परंतु ती वेळ त्यांच्यावर येणार नाही. शिवसेना-भाजप युतीने मित्र पक्षांची दखल न घेतल्याने राजू शेट्टी नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांनी आता आघाडीशी जवळीक केली आहे.


अहमद पटेल-शेट्टी चर्चा

जागावाटपासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीने काँग्रेसचे नेते अहमद पटेल आणि राजू शेट्टी यांची फोनवरून चर्चा झाली. या वेळी काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेला वर्धा किंवा सांगलीची जागा देण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून हातकणंगले येथे राजू शेट्टी तर काँग्रेसकडून आणखी एक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.