जालन्याच्या जागेबाबत खोतकर आग्रही; मातोश्रीवरच्या बैठकीनंतरही वाद कायम; आज औरंगाबादेत पडदा पडण्याची शक्यता



मुंबई, औरंगाबाद / प्रतिनिधीः
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची युती झाली आहे. भाजपने पहिल्या यादीत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची उमेदवारी जाहीर केली आहे, तरीही राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा या जागेसाठी आग्रह कायम आहे. मातोश्रीवर बैठक होऊनही त्यातून काहीच तोडगा निघालेला नाही. आज औरंगाबाद येथे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक होणार असून तीत या वादावर पदडा पडण्याची शक्यता आहे.
दानवे यांच्या उमेदवारीला खोतकर यांचा प्रचंड विरोध आहे. आतापर्यंत तीनदा बैठक होऊनही त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. खोतकर यांनी यापूर्वी मुख्यमंत्री तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यांशी चर्चा केली. आजही मातोश्रीवर उद्धव ठाकरे, महिला आणि बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे आणि खोतकर यांच्यात प्राथमिक बैठक पार पडली. जालन्यातील जागेवर आजच्या बैठकीत अंतिम तोडगा निघणार नसल्याचे आधीच स्पष्ट करण्यात आले होते; मात्र उद्या शिवसेना भाजप युतीचा दुसरा मेळावा औरंगाबादमध्ये पार पडणार आहे. त्याआधी रामा हॉटेलमध्ये मुख्यमंत्री फडणवीस, ठाकरे, दानवे आणि खोतकर यांच्यात होणार बैठक आहे. या बैठकीत जालनाच्या वादावर पडदा पडेल असा अंदाज वर्तवला जात आहे.


मी आजच्या बैठकीत ठाकरे यांच्यासमोर प्रस्ताव ठेवले आहेत. जालन्यात एक तर मैत्रीपूर्ण लढत व्हावी किंवा जालना शिवसेनेला सुटावी. जालन्याची जागा शिवसेना निश्‍चित जिंकून घेईल, हा विश्‍वास मला आहे आणि हे मी ठाकरे यांना पटवून दिले आहे. पंकजा मुंडे समन्वयक म्हणून आज बैठकीला आल्या होत्या. काँग्रेसमध्ये जाण्याबाबत अजून निर्णय नाही. उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत औरंगाबादच्या बैठकीत अंतिम निर्णय होईल, अशी माहिती खोतकर यांनी दिली आहे. खोतकर यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्याचा प्रस्ताव होता; परंतु जालन्यातील शिवसैनिक दानवे यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत.
दोन दिवसांपूर्वी खोतकर आणि काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यात औरंगाबादमध्ये गुप्त चर्चा झाली होती. या भेटीनंतर दोन दिवसांत खोतकर यांच्याबद्दल ‘गूड न्यूज’ मिळेल, असे सत्तार यांनी म्हटले होते. त्यामुळे खोतकर काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या; परंतु काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय झाला नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. आपण निवडणूक लढण्यास तयार असल्याचे खोतकरांनी आधीच म्हटले आहे. ठाकरे यांचा जो निर्णय असेल, तो आपल्याला मान्य असेल. ठाकरे माझ्या हिताचाच निर्णय घेतील, असे खोतकर आधीपासून म्हणत आहेत. खोतकर आणि दानवे यांच्यातील वादावर तोडगा काढण्यासाठी बैठकांवर बैठका होत आहेत; मात्र त्याला अद्याप यश मिळालेले नाही. त्यामुळे जालन्यातून नेमके कोण लढणार हा प्रश्‍न सुटला नसल्याचे दिसत आहे.

समन्वयकांच्या जिल्ह्यातच वाद

मराठवाड्यातील युतीच्या समन्वयकाची जबाबदारी पंकजा आणि खोतकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आता खोतकर-दानवे वाद मिटवण्यासाठी पंकजा समन्वयकाच्या भूमिकेत आहेत, तर पंकजदा यांच्या बीड जिल्ह्यात शिवसंग्रामच्या विनायक मेटे यांनी त्यांच्याविरोधात लढाई पुकारली आहे. अन्यत्र मात्र ते भाजपचा प्रचार करणार आहे. समन्वयकांच्या मतदारसंघातच समन्वय नसल्याचे त्यातून स्पष्ट होत आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget