Breaking News

स्वच्छता अभियान कचरा आपत्ती नसून संपत्ती-जगताप


जामखेड/प्रतिनिधी :सुका व ओल्या कचर्‍याची वर्गवारी करून निटनिटके व्यवस्थापन केले तर कचर्‍यापासून उत्पन्न मिळते. त्यामुळे कचरा ही आपत्ती नसून संपत्ती आहे. असे प्रतिपादन नगरपालिकेचेे मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी केले.

येथील ल.ना. होशिंग विद्यालयात जामखेड नगरपालिका व नवकार फाउंडेशनच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण 2020 जनजागृती मोहीम अभियान निमित्त अयोजीत कार्यक्रमात े मुख्याधिकारी सुहास जगताप अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, वैद्यकीय अधिकारी युवराज खराडे, ल.ना. होशिंग विद्यालयाचे प्राचार्य आश्रुबा फुंदे, आरोग्य अधिकारी प्रकाश गिते, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक निमोणकर, पत्रकार नासिर पठाण, यासीन शेख, सुदाम वराट आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना मुख्याधिकारी सुहास जगताप म्हणाले की, कचर्‍याची समस्या मोठी आहे. घरात साचलेल्या ओला व सुका कचरा वेगळा साठवावा. ओल्या कचर्‍यापासून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी घराच्या कंपाऊंडच्या परिसरात खड्डा खोदून ओला कचरा टाका व त्यावर मातीचा बेड देऊन कचर्‍याचे व्यवस्थापन केल्यास खतनिर्मिती होऊन पैसे मिळतील तर सुका कचर्‍यातील रद्दी कागद, प्लॅस्टिक, लोखंड वेगळे करुन ते विक्री केले तर पैसे मिळतील त्यामुळे कचरा ही समस्या नसून संपत्ती आहे. 

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे, नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, प्राचार्य आश्रुबा फुंदे, प्रा. बाळासाहेब पारखे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे अध्यापक यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कदम यांनी केले. तर प्रास्ताविक व आभार नवकार फाउंडेशनचे अध्यक्ष मिटूलाल नवलाखा यांनी मानले. या कार्यक्रमापूर्वी सदर स्वच्छ सर्वेक्षण अभियान निमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरीला पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे संचालक राजेंद्र मोरे व प्राचार्य अश्रुबा फुंदे यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरवात केली. विद्यालयापासून निघालेली फेरीत विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत सुंदर भारत, नखे काढा पोटाचे आजार टाळा, कचरा टाळा परिसर स्वच्छ करा अशा घोषणा देत जूने पोलिस स्टेशन, कोर्ट गल्ली, छत्रपती शिवाजी पेठ मार्गे, नगर बीड रस्त्याने प्रभात फेरी ल. ना. होशिंग विद्यालयात आली.