Breaking News

बसपाची उमेदवारी अ‍ॅड .वाकळेंना


अहमदनगर/प्रतिनिधी : “महाराष्ट्रात बहुजन समाज पार्टी व समाजवादी पार्टीचे गठबंधन झाले असून, नगर दक्षिणसाठी अ‍ॅड.नामदेव अर्जुन वाकळे यांच्या उमेदवारीची घोषणा बसपाचे प्रदेश सचिव काळुराम चौधरी यांनी केली.

सावेडी येथील माऊली सभागृह परिसरात झालेल्या बैठकीत त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करुन शिर्डी मतदारसंघासाठी देखील उमेदवार जाहीर करणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले. यावेळी बसपाचे जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, जिल्हा प्रभारी संजय डहाणे, सुनील ओहोळ, जिल्हा महासचिव राजू शिंदे, शहराध्यक्ष संतोष जाधव, शहर उपाध्यक्ष राजू भिंगारदिवे, विधानसभा महासचिव नितीन भालेराव, सलीम शेख, महादेव पालवे, सुभाष पांडे, प्रा.अशोक डोंगरे, मनोज उघाडे आदी उपस्थित होते.

यावेळी काळूराम चौधरी म्हणाले, “फुले, शाहू व आंबेडकर यांच्या विचारांनी बसपा सर्व समाजाला बरोबर घेऊन कार्य करीत आहे. फसव्या व धर्मांधशक्ती विरोधात बसपा हे एक पर्याय ठरणार असून, गरीबी व बेरोजगारी प्रश्‍न हटविण्यास प्राधान्य देऊन विकासात्मक मुद्दा घेऊन या निवडणुकीला सामोरे जात आहे. महाराष्ट्रात 44 जागा बसपा तर 4 जागा समाजवादी पक्ष लढवित असल्याचे त्यांनी सांगितले. 

अर्जुन वाकळे यांनी जातीयवादी व प्रस्थापितांविरोधात हा लढा असून बहुजन हिताय, बहुजन सुखाय या उद्देशाने निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. विकासात्मक दृष्टीकोनाला सर्वसामान्य जनता साथ देणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी सुहास पवार, प्रकाश गोसावी, संगीता भिंगारदिवे यांची निवड करुन त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.