Breaking News

जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू; उल्लंघन करणार्‍यांवर कडक कार्यवाही - जिल्हा निवडणूक अधिकारी

            अहमदनगर, दि. 10 - भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता तात्काळ लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश श्री. द्विवेदी यांनी दिले आहेत. 37-अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी तिसर्‍या टप्प्यात दिनांक 23 एप्रिलला तर 38-शिर्डी (अ.जा.) मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यात दिनांक 29 एप्रिलला मतदान होणार आहे.
            भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019चा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर श्री. द्विवेदी यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली. जिल्हा निवडणूक यंत्रणेने या निवडणुकीसाठी सर्व सज्जता केली असून विविध पथकांची स्थापनाही करण्यात आली आहे. राजकीय पक्ष आणि उमेदवारांमार्फत केल्या जाणार्‍या इलेक्ट्रॅानिक जाहिराती, सोशल मीडियावरील जाहिराती आणि बल्क एसेमेस यांचे प्रमाणीकरण करुन घेणे बंधनकारक राहणार आहे. तसेच पेड न्यूजवर लक्ष ठेवण्यासाठी पेड न्यूज समितीची स्थापनाही करण्यात आल्याची त्यांनी माहिती दिली. या निवडणुकीसाठी उमेदवारांना 70 लाख एवढी खर्च मर्यादा आयोगाने ठरवून दिली असून खर्च संनियंत्रणासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. श्री. द्विवेदी यांनी राजकीय पक्षांचीही बैठक घेऊन त्यांना आदर्श आचारसंहितेची माहिती दिली.

            अहमदनगर जिल्ह्यामध्ये 37-अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे  निवडणूक निर्णय अधिकारी असतील तर 38-शिर्डी (अ.जा.) मतदारसंघासाठी अपर जिल्हाधिकारी पिराजी सोरमारे हे निवडणूक निर्णय अधिकारी असतील. याशिवाय सहायक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.  जिल्हास्तरावर निवडणूक विषयक विविध कामकाजांसाठी समन्वय अधिकारीही नियुक्त करण्यात आले आहेत. ****