Breaking News

सुरेगाव बनले अवैध धंद्यांचे माहेरघर


कोपरगाव ता. / प्रतिनिधी - तालुक्यातील पश्चिम भागातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे समजले जाणारे व लोकसंख्येने सर्वात मोठे असणाऱ्या सुरेगावमध्ये बेकायदा दारू व मटका व्यवसाय खुलेआम सुरू आहे. परिसरातील गावांमध्येही अवैध धंदे तेजित आहेत. कोळपेवाडी,कोळगावथडी येथे दारूमुळे होणाऱ्या भांडणामुळे अनेकांचे बळी गेले होते. या सर्वांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी ग्रामपंचायतीच्यावतीने पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती सरपंच वाबळे यांनी दिली.

कोळपेवाडी पोलिसदूरक्षेत्रातील पोलिसांचे यांच्याशी 'अर्थपूर्ण' तडजोडी असल्याचे ग्रामस्थांचे आरोप आहे. या दूरक्षेत्राअंतर्गत कोळपेवाडी ,सुरेगाव ,कुंभारी ,माहेगावदेशमुख ,कोळगावथडी ,शहाजापूर ,मढी.बु.मढिखू. ,हंडेवाडी ,कारवाडी ,मंजूर ,देर्डे - चांदवड , आदी सुमारे १२ गावे समाविष्टआहेत. पोलिसांची संख्याही कमी आहे. परिसरात कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुह मोठा असून ऊस तोडणी मजूर ,कामगार मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे या वाढत्या अवैध धंद्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

सुरेगावात भरदिवसा बेकायदा दारूची विक्री होत आहे. मटक्याच्या टपच्या जागोजागी सुरूआहेत. गोदावरी उजव्या कालव्याच्या लगत असलेली बाजारपेठ , मोतिनगर , कोळपेवाडी , देर्डे फाटा, वेळापुर रस्ता, विघनवाडी शिवार, परिसर भागात मटका राजरोसपणे सुरू आहे. या धंद्यांमुळे अनेक वेळा भांडणे, हाणामाऱ्या,खून आदी प्रकरणे घडली आहेत. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल झालेले आहेत. परंतु कागदी घोडे नाचवून वरिष्ठांना कारवाईचा अहवाल पाठविला जातो.परंतु परिस्थती जैसे थे राहते.अनेक वेळा निवेदने दिलेली आहेत. परंतु अवैध धंद्यांचे उच्चाटन झालेले नाही. त्यामुळे या रवांवर प्रतिबंध घालावा या मागणीसाठी पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात येणार आहे.