Breaking News

माथाडी कामगार संघटनेत संघर्षाला सुरूवात


सातारा / प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शेतकर्‍यांची, कष्टकर्‍यांची अर्थवाहिनी समजली जाणारी माथाडी कामगार संघटना ही राज्यातील सर्वांत मोठी कामगार संघटना असून या संघटनेत आता फूट पडली आहे. माथाडी नेते नरेंद्र पाटील विरुद्ध आ. शशिकांत शिंदे यांच्यातील संघर्षाने माथाडी चळवळीला आता फूटीचे ग्रहण लागले आहे. नरेंद्र पाटील यांची गेल्या वर्षभरात भारतीय जनता पक्षाशी जवळीक वाढत गेल्यानंतर आ. शशिकांत शिंदे आणि नरेंद्र पाटील यांच्यात शितयुध्द सुरू झाले आहे. 

माथाडी कामगार संघटनेवर आता वर्चस्व कोणाचे? असा प्रश्र्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. एकीकडे माथाडी कामगारांचे सर्वेसर्वा अण्णासाहेब पाटील यांच्या माध्यमातून माथाडी संघटना उभी राहिली. त्यानंतर शिवाजीराव पाटील यांनी माथाडी कामगार संघटनेची धुरा पुढे सांभाळत मुंबईत माथाडींची एक वेगळी शक्ती निर्माण केली. त्याच धर्तीवर आ. शशिकांत शिंदे, ऋषिकांत शिंदे, वसंतराव मानकुमरेंसह सातारा जिल्ह्यातील नेत्यांनी माथाडी संघटनेत स्वत:ची एक वेगळी ताकद निर्माण केली.दरम्यान, आता माथाडी कामगार संघटनेतील नेते विविध पक्षांमध्ये विखुरले गेल्याने संघटनेला पक्षीय वातावरणाची झालर लागली आहे.

 त्यामुळे भाजप- राष्ट्रवादी असा कलगीतुरा माथाडी कामगार संघटनेच्या नेतृत्वात सुरू झाले आहेत. माथाडी कामगार संघटनेत आ. शशिकांत शिंदे यांची एक वेगळी शक्ती आहे. त्याचबरोबर त्यांचे बंधू ऋषिकांत यांचीही ताकद संघटनेत मोठी असून गुलाबराव जगताप यांच्यासह माथाडी कामगार संघटनेमध्ये आता सुंदोपसुंदी सुरू झाली आहे. नरेंद्र पाटील यांच्याबरोबर वसंतराव मानकुमरे व काही माथाडींचे अन्य काही नेतेसुध्दा सक्रिय आहेत. माथाडी कामगार संघटनेने आतापर्यंत राष्ट्रवादीला साथ दिली होती. 

आ. शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचेच आमदार आहेत. परंतू माथाडी कामगारांचे प्रश्र्न सोडवण्यासाठी नरेंद्र पाटील यांनी भाजपशी घरोबा केला. मराठा आंदोलनात सक्रिय असलेल्या नरेंद्र पाटील यांना भाजपने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपदही दिले आहे.पाटील आणि शिंदे यांच्यात शीतयुद्ध होतेच, त्यातच सोमवारी कळंबोली येथे माथाडी कामगार मेळाव्यात शशिकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका करत हे सरकार माथाडी संघटना संपवत असल्याचा आरोप केला. त्याला नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांनी माथाडी कामगारांना न्याय मिळवून दिला आहे. शशिकांत शिंदे यांनी माथाडींच्या कोणत्याही प्रश्र्नाचा पाठपुरावा केला नाही. त्यामुळे लोकांनी व माथाडींनी संघटनेतील गद्दार शोधावा असे उघड आव्हानच नरेंद्र पाटील यांनी दिले आहे. नरेंद्र पाटील व शशिकांत शिंदे यांच्यातील संघर्षामुळे माथाडी संघटनेतही उभी फूट पडली आहे. त्याचे परिणाम लोकसभेच्या निवडणुकीत दिसणार आहेत.