Breaking News

पुरोगामी विचार-चळवळ गतीमान व्हावी


सातारा / प्रतिनिधी : पुरोगामी विचार - चळवळ गतीमान झाली पाहिजे, असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी व्यक्त केले व या दिशेने मिनाज सय्यद यांचे कार्य भूषणास्पद असल्याचे सांगितले.
संबोधी प्रतिष्ठानचे संस्थापक सदस्य ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिवंगत कॅप्टन साहेबराव बनसोडे यांचे स्मरणार्थ देण्यात येणारा या वर्षीचा बारावा सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार परिवर्तनवादी डाव्या संघटना समन्वय समितीचे संघटक व महाराष्ट्र राज्य पातळीवरील जातीय धार्मिक सलोखा गटाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मिनाज सय्यद यांना डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या हस्ते नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये झालेल्या समारंभात प्रदान करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. विचारमंचावर ज्येष्ठ अभ्यासक कार्यकर्ते किशोर बेडकिहाळ, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य अण्णासाहेब होवाळे, उपाध्यक्ष दिनकर झिंब्रे, कार्यवाह ऍड. हौसेराव धुमाळ उपस्थित होते. 

यावेळी किशोर बेडकिहाळ व डॉं. साळुंखे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा येथील राजवाड्यातील छ. प्रतापसिंह हायस्कूलमध्ये पहिली ते चवथी इयत्ता पर्यंत फी भरून शिक्षण घेतले. याबाबतची शाळेच्या दप्तरातील बाबासाहेबांची सहीची नोंद असलेली ऐतिहासिक दस्तावेज फोटो कॉंपी सह संबोधीच्या बत्तीस वर्षातील वाटचाली मधील निवडक कार्यक्रमांचे दोनशेच्या वरील रंगीत फोटोंचा समावेश असलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. साळुंखे म्हणाले, प्रसिद्धी पासून दूर राहून चिकाटीने काम करण्याचा समान दुवा कॅप्टन साहेबराव बनसोडे व मिनाज सय्यद यांच्यात असल्याने योग्य व्यक्तीचा योग्य वयात गौरव होत आहे याचा आनंद आहे. किशोर बेडकिहाळ म्हणाले, मिनाजच्या चळवळीतील प्रवासाचा मी साक्षीदार आहे. युवा पिढीला घडवण्याचे त्याचे कार्य कौतुकास्पद आहे. संबोधी प्रतिष्ठान बत्तीस वर्षापासून प्रबुद्ध नागरी समाज घडविण्याचे मौलिक कार्य करीत आहे. महाराष्ट्रातील सामाजिक संस्थांनी त्यांचे अनुकरण करावे. 

मिनाज यांनी आपल्या जीवन प्रवास व चळवळीतील अनुभव कथन केले. त्यांच्या पत्नी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजश्री देशपांडे, सलोखा गटाचे पुणे येथील कार्यकर्ते लेखक प्रमोद मुजुमदार तसेच थोरांच्या स्मृती व्याख्यानमालेचे बीजारोपण करणारे आर. आर. पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. त्यांचा तसेच कॅप्टन बनसोडे यांच्या पत्नी यमुनाताई यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.