Breaking News

शेवगाव नगरपालिका विषय समितींच्या निवडी बिनविरोध


शेवगाव/प्रतिनिधी : शेवगाव नगरपालिका विषय समितींच्या सभापती निवडी शनिवार दि.2 रोजी बिनविरोध पार पडल्या. आरोग्य व शिक्षण समितीच्या सभापतीपदी पदसिध्द उपाध्यक्ष भाजपचे वजीर पठाण, बांधकाम समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे गटनेते सागर फडके, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या विजयमाला तिजोरे तर पाणी पुरवठा समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी उमर शेख यांच्या बिनविरोध निवडी करण्यात आल्या. गेल्या सात महिन्यापुर्वी राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या नगरपालिका भाजपने झेंडा फडकावला होता. मात्र, आजच्या निवडीत पुन्हा राष्ट्रवादीने कुरघोडी करत सर्व समित्यांवर वर्चस्व मिळविले आहे. 

नगरपालिकेच्या सभागृहात पीठासीन अधिकारी तथा प्रांताधितारी देवदत्त केकाण यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी 12 वाजता विशेषसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत विषय समिती सभापतींच्या निवडीचा प्रस्ताव मांडण्यात आला. यामध्ये बांधकाम समितीच्या सभापती पदासाठी सागर फडके यांच्या नावाची सुचना वर्षा लिंगे यांनी मांडली. त्यास इंदुबाई म्हस्के यांनी अनुमोदन दिले. तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी विजयमाला तिजोरे यांच्या नावाची सुचना माजी नगराध्यक्षा विद्या लांडे यांनी मांडली. त्यास यमुनाबाई ढोरकुले यांनी अनुमोदन दिले. तर पाणी पुरवठा समितीच्या सभापतीपदी उमर शेख यांच्या नावाची सुचना भाऊसाहेब कोल्हे यांनी मांडली. त्यास विकास फलके यांनी अनुमोदन दिले. 

तीनही समितीच्या निवडीसाठी एकमेव अर्ज आल्याने फडके, तिजोरे व शेख यांच्या बिनविरोध निवडी करण्यात आल्या. तर स्थायी समितीच्या सदस्यपदी राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्षा विद्या अरुण लांडे, व भाजपच्या गटनेत्या सविता नितीन दहिवाळकर यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी मुख्याधिकारी अंबादास गर्कळ, नगराध्यक्षा राणी मोहीते, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण लांडे, बाजार समितीचे संचालक संजय फडके, फिरोजखान पठाण, समीर शेख, अमर शेख, इम्रान शेख, कमलेश लांडगे आदींसह सर्व नगरसेवक उपस्थित होते.

सुमारे सात महिन्यापूर्वी शेवगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीमुळे ही दोन्ही पदे भाजपच्या ताब्यात गेली होती. मात्र, भाजपमधील गटबाजीचा फायदा माजी आ. चंद्रशेखर घुले व ज्येष्ठ नेते अरुण पाटील लांडे यांनी घेत सर्व विषय समित्यांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व मिळवले. त्यामुळे महत्वाच्या समजल्या जाणार्‍या स्थायी समितीत राष्ट्रवादीचे बहुमत झाले आहे.