Breaking News

असंघटित कामगारांसाठी श्रमयोगी मानधन योजना


अहमदनगर/प्रतिनिधी : केंद्र सरकारच्या वतीने देशातील असंघटीत कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना लागू केली असून या योजनेत किमान 18 वर्षे व कमाल 40 वर्षे वय असलेल्या असंघटीत कामगारांना सहभाग घेता येणार आहे. ज्या कामगारांचे मासिक उत्पन्न पंधरा हजार रुपयांंपेक्षा कमी आहे असे कामगार ई-सेवा केंद्रामध्ये नोंदणी करु शकतील त्यासाठी आधार कार्ड, साधारण बचत बँक खाते अथवा जनधन खाते क्रमांक असणे बंधनकारक आहे.

या नोंदणीनंतर दरमहा रु.55 ते 200 रुपये अंशदान वयोगटानुसार ठरवून दिल्याप्रमाणे खात्यात जमा ठेवायचे आहे, तेवढेच अंशदान सरकारच्या वतीने भरले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेणारा कामगार हा आयकर भरणारा किंवा अन्य कोणत्याही पेन्शन योजनेचा लाभ घेणारा नसावा. वयाच्या 60 वर्षानंतर या योजनेंतर्गत मासिक 3 हजार रुपये मिळू शकणार आहेत.
या कार्यक्रमाची जबाबदारी जिल्ह्याचे सहायक भविष्य निधी आयुक्त तथा नोडल अधिकार्‍यांवर सोपविण्यात आली आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नुकताच प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेच्या उदघाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अहमदाबाद येथे आयोजित योजनेच्या उदघाटनाचे थेट प्रक्षेपण यावेळी दाखविण्यात आले. याप्रसंगी खासदार दिलीप गांधी, महापौर बाळासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने, सहायक कामगार आयुक्त नितीन पाटणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रशांत शिर्के, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता) परिक्षित यादव, स्वप्नील शिंदे आदी उपस्थित होत.
नोडल अधिकारी अभिषेककुमार मिश्र यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी लाभार्थ्यांना योजनेच्या नोंदणीचे कार्ड प्रदान करण्यात आले.नोडल अधिकार्‍यांनी योजनेची सविस्तर माहिती दिली. तसेच सामान्य सेवा केंद्राच्या जिल्हा व्यवस्थापकांनी योजनेच्या नोंदणी प्रक्रियेची माहिती दिली. कार्यक्रमात असंघटीत कामगार, पीएमएसवायएम योजनेचे लाभार्थी, बीएमएसचे पदाधिकारी तसेच एलआयसी, मुख्य अधिकारी उपस्थित होते.