मोदींच्या मतदारसंघात प्रियंका प्रचाराला!


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर आता प्रत्येक पक्षाने प्रचाराच्या दृष्टीने पावले उचलली असून काँग्रेस महासचिव प्रियंका गांधीसुद्धा यात हिरीरिने सहभागी झाल्या आहेत. राजकीय पटलावर सक्रिय झाल्यानंतर आता त्या काँग्रेससाठीच्या प्रचारात व्यग्र झाल्या आहेत. 20 मार्चला त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघात, वाराणसीत प्रचार करणार आहेत.

प्रचारादरम्यान गंगाकिनारी असलेल्या विविध घाटांना त्या भेट देणार आहेत. तीन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौर्‍यावर असणार्‍या प्रियंका गांधी प्रियंका गांधी यांच्या दौर्‍याची सुरुवात 18 मार्चपासून होणार आहे. हा प्रवास त्या मोटारबोटीतून करणार आहेत. मोटरबोटीतून वाराणसी यात्रा करण्यासाठी गांधी यांनी निवडणूक आयोगाकडे परवानगीही मागितली आहे. होळीच्या उत्सवाआधी या प्रचाराच्या नौका यात्रेला सुरुवात होणार आहे. ज्यामध्ये विविध संगम घाटांना भेट दिल्यानंतर प्रियंका वाराणासी भागात असणार्‍या काही मंदिरांनाही भेट देणार आहेत. या प्रवासात त्या काही प्रचारसभांनाही संबोधित करणार आहेत. सिरसा, सितामणी आणि मिर्झापूर या भागातील मतदारांची भेटही घेणार आहेत.

मोदी यांची वाराणसी मतदारसंघातील उमेदवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीच जाहीर केली आहे. या मतदारसंघात मोदी यांच्याविरोधात ‘भीम आर्मी’चे प्रमुख चंद्रशेखर यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. चंद्रशेखर यांची दलित समाजात मोठी चलती आहे. त्यांना आता प्रियंका यांनीही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे कदाचित काँग्रेसचा पाठिंबा घेऊन चंद्रशेखर वाराणसीत मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर 20 मार्चचा संपूर्ण दिवस त्या मोदी यांच्या मतदारसंघात म्हणजेच वाराणसी येथे असणार आहेत. काशी विश्‍वनाथ मंदिर, शितळा मंदिर, दशाश्‍वमेध घाट, अस्सी घाट अशा टप्प्यांवर त्या थांबणार असून, जनतेशी संवाद साधणार आहेत. यामध्ये त्यांना काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांचीही साथ लाभणार आहे.
प्रियंका यांनी काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये प्रचारसभा घेतली होती. ज्यामध्ये त्यांनी जनतेशी थेट संवाद करत काही मुद्दे मांडले होते. त्यांच्या या भाषणाकडे राजकीय नेते मडळींचे चांगलेच लक्ष लागलेले होते. प्रियंका पूर्वी अमेठी आणि रायबरेली या मतदार संघांसाठीच प्रचार करायच्या; परंतु महासचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेतली असून, विरोधकांना आव्हान दिले आहे. गुजरातमध्ये मोदी यांचा नामोल्लेख टाळून त्यांनी काही प्रश्‍न उपस्थित केले, त्याला कोणीही उत्तर दिले नाही. आता वाराणसीत त्या काय बोलतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. 

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget