Breaking News

साहेब जगणंच अवघड झालयं हो ! शेतीपुरक दुग्ध व्यवसाय तोट्याचाचं


सदानंद जगताप, खटाव/(प्रतिनिधी) : दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली असतानाच, जनावरांचा चारा व पशुखाद्याचे दर गगनाला भिडले आहेत. परिणामी कित्येकदा जनावरांची उपासमार होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. याचा दुधाच्या उत्पन्नावर विपरित परिणाम होऊन, उत्पादनात घट होऊ लागली आहे. गेल्या कित्येक दिवसापासून दूधाचे दर घटल्याने शेतकर्‍याचे कंबरड मोडलं आहे. त्यामुळे साहेब जगणं अवघड झालयं असे म्हणण्याशिवाय शेतकर्‍यांपुढे पर्याय राहिला नाही.

यंदाच्या वर्षी अल्प पर्ज्यन्यमान तसेच रब्बी हंगामात पावसाने दांडी मारली. परिणामी दिवसेंदिवस जनावरांच्या चार्‍यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्र्न गंभीर होत चालला आहे. अशा स्थितीत काही महिन्यापूर्वी शासनाने शेतकर्‍यांच्या खात्यात प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. दुष्काळ सद्दष्य परिस्थिती निर्माण झालेली असताना दुधाचे अनुदान बंद करण्याचा घाट घातला आहे. जनावरांच्या चार्‍यासह खाद्याचे दर गगणाला भिडले आहेत. यामुळे दुग्ध व्यवसायातील खर्च गतवर्षीच्या तुलनेने 30 ते 35% वाढला आहे. परिणामी दुग्धव्यवसाय तोट्याचा ठरू लागला आहे.

गेल्या दीड वर्षापासून दुधाचे दर व त्या संबधाने होणारी अंदोलने सातत्याने चर्चेत आली होती. दुधाला दर नसल्याने अंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन, शेतीला पुरक असणार्‍या दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी युती सरकारने प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याचे आश्वासन दिले होते. दुध खरेदी 27 रु. प्रति लिटर खरेदी करणार असल्याचे सांगितले होते मात्र, प्रत्यक्षात 17 ते 18 रुपये दराने शेतकर्‍यांकडून खरेदी होत असल्याचे दिसून येत आहे.

दुधाच्या दरात वाढ करण्यासाठी शेतकरी संघटनेने मोठ्या प्रमाणावर अंदोलने केली. त्यानंतर दुधाला प्रति लिटर पाच रूपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला. परंतू गेल्या महिनाभरापासून हे अनुदान बंद झाले आहे. त्यामुळे पुन्हा दुध खरेदी जुन्या दराने म्हणजे 3.5 फॅट असलेल्या दुधाला 20 रुपये दर दिला जात आहे. मात्र प्रत्यक्षात दुध उत्पादकाचे हाती 17 ते18.50 रुपये पडत आहेत. सध्याच्या परिस्थितीनुसार चारा-पाण्याचा प्रश्र्न, तसेच पशुखाद्याचे वाढलेले दर पाहता, दुधाला किमान प्रतिलीटर 30 ते 35 रुपये दर मिळणे गरजेचा आहे. तरच दुग्ध व्यवसाय शेतकर्‍याला परवडेल.
अनुदान बंद झाल्याने, दुग्ध व्यवसायिक शेतकर्‍याचे कंबरडे मोडले आहे. सत्ताधारी सरकारने दुग्ध व्यवसायाला उर्जीत अवस्था आणण्यासाठी दुधाचे बंद केलेले अनुदान पुर्ववत सुरु करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.