Breaking News

बाह्य वळण रस्त्यासाठीचे उपोषन मागे


शेवगाव/प्रतिनिधी
अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या बाह्य वळण रस्त्याच्या प्रश्‍नामध्ये राजकारण न करता त्यातील त्रुटी काढून तो कायमचा मार्गी लावला जाईल. तो चिघळला जावू नये, यासाठी आपणा सर्वांना बरोबर घेऊन निर्णय घेऊ, तसेच अतिक्रमणाबाबत कोणावरही अन्याय होणार नाही, अशा सक्त सुचना आपण दिल्या असल्याचे आ. मोनिका राजळे यांनी सांगितल्याने गेल्या दोन दिवसापासून क्रांती चौकात बाह्यवळण रस्त्याच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या सर्वपक्षीय उपोषणकर्त्यांनी आ. राजळे यांच्या हस्ते रसपान घेऊन उपोषण सोडले.
यावेळी राजळे म्हणाल्या की, हा प्रश्‍न तुमच्या आमच्या सर्वांच्याच जिव्हाळ्याचा आहे. नगर येथे या संदर्भात बैठक घेण्यात आली. यात कुठलेही राजकारण न करता मागील काहीही न काढता आपणास काही निर्णय घ्यावे लागतील. आपण सर्वजण एकत्र बसून मागे या कामासाठी आलेले पैसे परत का गेले याचा आढावा घेऊन प्रशासन म्हणून काही निर्णय घ्यावे लागतील ते घेतले जातील. समृध्दी योजनेलाही विरोध झाला होता.विकासाला पुढे नेतांना निर्णय ध्यावे लागतात. गेल्या काही दिवसात येथे काही दुर्दैवी घटना घडल्या. वाढत्या शहरामुळे होणारी वर्दळ, जवळच्या साखर कारखान्याच्या ऊसाची होणारी वाहतूक, मराठवाडयात जाण्यासाठी सर्वात सोयीस्कर मार्ग अशी त्यास अनेक कारणे आहेत. येथे टपरीधारकांना नोटिसा आल्या असतील आपण त्या रोखल्या असल्या तरीही दुखणे कायमचे संपविण्यासठी वाहतूक पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग शेवगावकरांनीही अडचणीच्या ठिकाणी थोडे मागे सरकले पाहिजे. म्हणजे मार्ग सुकर होईल. शेवटी आपली वाहतूक सुरळीत व्हावी, त्याचबरोबर आपले छोटेमोठे व्यवसायही चालले पाहिजेत. मागील नियोजित बाह्यवळण रस्त्यावर आज काही ठिकाणी पक्की घरे झाली आहेत. तीही पाडून चालणार नाहीत. ती वाचवून नवीन मार्ग आखावा लागेल. आपण सर्वजण मिळून त्यातून ठोस असा मार्ग काढू असे त्या म्हणाल्या.
ज्येष्ठ नेते अरुण पाटील लांडे, सभापती क्षितिज घुले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय फडके, बापूसाहेब पाटेकर, अजिंक्य लांडे, नगरसेवक महेश फलके, अरुण मुंडे, तहसीलदार डॉ.विनोद भामरे, पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, राजीव चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे पाठक उपस्थित होते.