Breaking News

लोकसहभागातून येळी गाव दुष्काळमुक्त करण्याचा ग्रामस्थांचा निर्धार


पाथर्डी/प्रतिनिधी
पाथर्डी तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी असून तालुक्यातील येळी येथील दत्ता बडे यांनी ह.भ.प.रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व शहादेव नागरे यांच्या संकल्पनेतून जलक्रांती फाऊंडेशन स्थापन करत या फाउंडेशनच्या माध्यमातून येळी गाव कायमस्वरूपी दुष्काळमुक्त गाव करून राज्यासमोर येळी गावाचे आदर्श मॉडेल ठेवणार असल्याचा निर्धार ग्रामस्थानी केला आहे.

तसेच गावातील ह.भ.प.नामदेव महाराज बडे, सरपंच संजय बडे, विजय बडे, लक्ष्मण बडे, सागर बडे, तुषार बडे, देविदास बडे, राहुल बडे, किशोर बडे, विकास फुंदे, अमोल बडे, संजय बडे मेजर, याचे विशेष सहकार्य लाभत आहे.

संकल्प परिपुर्तेसाठी जलक्रांती फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली आहे.लोकसहभागातून सर्व गावातील नागरिकांना एकत्र आणत येणार्‍या पर्जन्यमानात येळी गावाच्या परिसरातील होणार्‍या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवण्यासाठी येळी गावाचा भौगोलिक अभ्यास करून डोंगराच्या माथ्यावर वन तलाव निर्माण करणे, ओढ्याच्या व नदीच्या उगमस्थानी प्रत्येक शंभर फुटावर एल.बी.एस. बंधारे उभारणे, नदीवर किंवा ओढ्यावर असलेले पाझर तलाव व नाले यांच्यातील गाळ काढून पूर्णंबांधणी करणे, शिरपूर पॅटर्न प्रमाणे बंधारे सहाशे फूट उभारणे, गावातील लोकांचे प्रबोधन करून पाणी जिरवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार असून या उपाययोजना आगामी काळात जलक्रांती फाऊंडेशनच्यावतीने करण्यात येणार आहेत.

रामगिरी महाराज यांच्या सहकार्याने पाथर्डी तालुक्यात तसेच राज्यात जे गाव आमंत्रित करील त्या गावामध्ये दुष्काळ कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी जलक्रांती फाऊंडेशनमाध्यमातून उपाययोजना करण्यात येणार आहे. तसेच आगामी काळात मुळा धरणाचे पाणी तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये पोहचविण्यासाठी लोकचळवळ उभा करणार आहे.