Breaking News

लेख - तरूणांच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक


इतकेच मला जातांना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते, महान कवी सुरेश भट यांनी माणसाला मरण्यापेक्षा जीवन किती त्रास देतं त्याचे यथार्थ वर्णन करत जीवन आणि मरणातील फरक स्पष्ट केला होता पण मरण सुटका तेव्हाच करतं जेव्हा आपण आपल्या जीवनातील महत्वाच्या जबाबदार्या परिस्थितीशी दोन हात करत पार पाडतो किंबहुना गीतेमध्ये भगवंताने अर्जुनाला (आपण सारे अर्जुन आहोत) अर्थात अर्जुनाच्या माध्यमातून जगातील सगळ्या जिवांना अगोदर कर्म करण्याचा उपदेश केला आहे. कर्म अगोदर करावेच लागेल मग मरणाकडुन सुटका करुन घ्यायला काही हरकत नसावी. पण अलीकडच्या काळात कर्म करण्याअगोदरच मरणाकडुन सुटका करून घ्यायची लोकांना खुप घाई झाली असल्याचे चित्र आहे. त्याची सजा आई-वडिलांना मिळत आहे. मुलगा एकदा मरतो पण त्या मुलाच्या अतीव दुखात आई वडील रोज मरतात अर्थात त्यांचे जीवन हे मरणयातना सारखेच होते. आजच्या तरुण मुलांच्यात सहनशील वृत्तीचा अभाव असल्यामुळे ते थोड्याशा दुःखाने खचुन जाऊन जीवन संपवण्याचा निर्णय घेतात. प्रेमात आलेल्या अपयशामुळे खचून जाऊन आत्महत्या करणारांची संख्या मोठी आहे. 

खर तर आजच्या शिक्षणामध्ये जीवन जगण्याचे धडे अगदी पहिलीपासून असायला हवेत. इंग्रजी शिक्षणापेक्षाही मुलांना जीवन जगायला शिकवणं खुपच गरजेचं आहे. किशोरवयीन मुलांच्या आत्महत्या ईतक्या मोठ्या प्रमाणात का वाढल्या याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न कोणी करत नाही. त्याचं खरं कारण म्हणजे मुलं जीवनामध्ये काही गोष्टी वेळेत सोडायला शिकत नाहीत. असं म्हटलं जातं की जीवनात काही गोष्टी, काही व्यक्ती, काही भावनांना धरून ठेवण्यापेक्षा सोडून देण्यातच खरी मजा असते. आपण एखाद्या मित्र मैत्रिणीलाही समजुतीच्या स्वरात ’जाऊ दे, सोडून दे ना यार’ असा सल्ला सहज देवुन जातो. एखाद्या सोबत भांडण किंवा मतभेद असतील तर आपल्याला ही कोणी सहज सांगतं ’जाउ दे सोडून दे, झालं गेलं विसरुन जा’. पण हे ’सोडुन देणं’ किंवा ’झालं गेलं विसरुन जाणं एवढं सोपं असतं का?, तर नक्कीच नाही. त्याला आपण जितकं सोडायचा यत्न करू तितकं ते आपल्याला जवळ येतं. तरीसुद्धा ’सोडुन देणं’ तितकच गरजेचं असतं, जितकी शरीराला प्राणवायूची गरज असते. जीवन जगत असताना पावलापावलावर ते लक्षात येतं. जीवन जगत असताना रस्ता सरळ नसतो आणि या जीवन प्रवासात खुप काही गोष्टी सोडाव्या लागतात अर्थात तरुणांच्या भाषेत ’मिस’ कराव्या लागतात पण या चंचल तरुण वयात ती सवय नसल्यामुळे अनेक व्यक्ती किंवा वल्ली आपल्याकडुन सोडल्या जात नाहीत आणि मग आयुष्याच्या वाटा मात्र अडविल्या जातात. यशाची शिखरे पादाक्रांत करण्याआधीच अपयश पदरी पडते.

 प्रेमाची परिभाषा आणि परिमाणे वेगळी असल्यामुळे ती एक भावना सहजासहजी सुटत नाही आणि मग आपण आपल्याच हाताने आपल्या यशाच्या मार्गात खड्डा खणून ठेवतो. म्हणुन प्रेम कितीही विसरता आलं नाही तरी सोडता मात्र नक्कीच आलं पाहिजे. आयुष्यात काही माणसांना कितीही विसरू म्हटलं तरी विसरता येत नाही. जी माणसं आपल्या मनात घर करून बसली त्यांची घरं कधीच पाडता येत नसतात. दुसरी गोष्ट नोकरी आणि कामा धंद्यानिमित्त घर सोडता आलं पाहिजे. आई-वडिलांना सोडुन बाहेर राहायला शिकलं पाहिजे. ज्याला घरही सुटत नाही त्याचा विकास खुंटला जातो. जो सोडायला शिकतो तोच खरा आयुष्यात यशस्वी होतो. 

आयुष्यात आपल्याला सुख, मिञ, आई-वडीलांचा सहवास, मौज-मजा, पैसा, नाती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रेम हवे असते आणि ईश्‍वराच्या कृपेने तात्कालिक सुखप्राप्ती म्हणुन ते आपल्याला मिळते. त्यातच आपण गुरफटुन जातो. जे नियती किंवा ईश्‍वर आपल्याला देतो ते हिरावुन घेण्याच्या अधिकारही त्याला आहे. जीवनाच्या या लांब पल्ल्याच्या प्रवासात या मोहयुक्त गोष्टींवर काही कारणास्तव पाणी फेरले जाते. मिळालेले सर्व काही नियतीकडुण हिरावले गेले तरी ते आपल्याकडुन सोडले जात नाही. आपल्याला पुन्हा-पुन्हा तेच तेच हवे असते आणि या अवस्थेत माणुस खुप दुखी होतो. पण जो गमावलेले आहे ते सोडुन देवुन मेहनतीने समाजमान्यता मिळवितो तोच जिवनाच्या पटावर यशस्वी होतो व तोच आई-वडील, समाजाला सुखी ठेवु शकतोे. अनेक जणांच्या आयुष्यात ’प्रेम’ हे वादळासारखे येते आणि वादळासारखेच निघुन जाते. मागे फक्त वेदनारुपी आठवणींचा खच राहतो. त्या आठवणींच्या रुपाने जिवंत असलेले ते प्रेम माणसाला सोडवत नाही. तो त्यालाच धरुण बसतो आणि त्यातुनच नैराश्यचा काटेरी रस्ता आत्महत्येकडे घेवुन जातो. पण हे टाळण्यासाठी जो तिच्या किंवा त्याच्या परत येण्याच्या अपेक्षेला आणि आठवणींनाही मुठमाती देतो अर्थात सोडतो तोच जिवनाच्या गाडीत व्यवस्थित प्रवास करतो. ज्याच्या किंवा जिच्या परत येण्याची सुतराम शक्यता नसते त्याची वाट पाहत जो थांबतो तो जीवनात बरबाद होतो म्हणुन तरुणांनी जिवनात पुढे जायचे असेल तर सोडायला शिकायला हवे आहे. ज्यांनी आपल्याला आपले बोट धरूण चालायला शिकविले, पोटाला चिमटा घेवुन शिक्षण दिले, स्वतः ठिगळं दिलेली कपडे घालुन आपल्याला नवे करकरित कपडे दिले, वेळेप्रसंगी ज्यांनी मुकपणे स्वतः उपाशी राहुन आपली भुक भागविली, स्वतः उन्हात राहुन आपल्याला सावली दिली अशा माता आणि पित्याला महिन्यापुर्वी मिळालेल्या प्रेमासाठी दुःख आणि यायनांच्या गर्तेत ढकलुन त्यांच्या डोळ्यात अश्रु आणणे यापेक्षा मोठा नरक नाही. माता-पित्याच्या भावनेपेक्षा जगात कुठलीही गोष्ट मोठी असु शकत नाही. मुलींनी प्रेमाच्या नावाखाली फसल्या जावु नका व कोणाला फसवु नका. खोट्या शपथा घेवुन कोणाशी वादे करु नका. मुलांना भावनांच्या गर्तेत अडकवु नका की ज्यामुळे त्याच्यावर आत्महत्येची वेळ येईल. 

अनेक मुली प्रेमाचे खोटे नाटक करतात. सध्या अनेक शाळा कॉलेजमध्ये प्रेमातुन आत्महत्येचे प्रमाण खुपच मोठे आहे. रोज एकतरी आत्महत्या झाल्याशिवाय राहत नाही. कोणी पंख्याला लटकवून घेत आहे तर कोणी रेल्वेखाली जात आहे. कोणी तर बुटाच्या नाडीने गळा आवळून घेत आहे. शेतकर्यांच्या आत्महत्याखालोखाल किशोरवयीन मुलांच्या आत्महत्येची टक्केवारीही धक्कादायक आहे आणि विषेश दखलपात्र गोष्ट ही कि ही सर्व मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकलेली आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इंग्रजी व्यतिरिक्त संस्कार, निती, मुल्ये तथा व्यक्तिमत्व विकास शिकविला जात नाही हे वास्तवसुद्धा नाकारता येत नाही. का करतात ही मुलं आत्महत्या?आई-बाबांनी दिलेलं जीवन एवढं स्वस्त का व्हावं? एखाद्या क्षुल्लक कारणावरून आपण आपले जीवन संपविण्याची चुक चुकूनसुद्धा करू नये. प्रेम -ब्रिम हे सगळं ’झुठ’ आहे. आपली प्रेयसी जे काही बोलते ते सगळं खोटं असतं हे लक्षात घेणं गरजेचं आहे. नुसतं रडत बसुन किंवा जीवन संपवुन काही होणार नसतं. तुमच्या जाण्याने त्याला किंवा तिला काही फरक पडणार नाही. कोणाचं कोणावाचुन या जगात अडत नाही. तुम्ही गेले तरी या जगाला काही फरक पडणार नाही. तुमच्यासाठी दोन दिवस सुध्दा कोणी रडणार नाही. तुमची ’ती’ किंवा ’तो’ तर मुळीच नाही. तिला दुसरा कोणीतरी भेटेल पण तुमच्या आई-बाबांवर काय बेतेल याचा विचार या तरुण मुलांनी नक्कीच करायला हवा आहे. दोन दिवसांच्या खोटारड्या प्रेमासाठी मरण्यापेक्षा ज्यांनी आपल्याला जीवन दिलं किंवा जिने आपल्यावर गर्भात असल्यापासून म्हणजेच आपण या जगात येण्याच्या आधीपासून प्रेमच केलं तिच्यासाठी जगायला काय हरकत आहे.


लेखक- दत्ता पवार