Breaking News

मतदार संघाला सक्षम नेतृत्वाची गरज : विखे


अहमदनगर /प्रतिनिधी : “आपण लोकसभेसाठी कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी करणार आहोत.चिन्ह कोणतेही असो परंतु आपण लोकांची सेवा करण्यासाठी या निवडणुकीत उतरणार आहोत. मतदार संघाला एका सक्षम नेतृत्वाची गरज आहे. नियोजन पद्धतीने नागरिकांचे प्रश्‍न सोडविणे माझ्यासाठी महत्वाचे असून ते सोडविण्यासाठी एक सक्षम लोकप्रतिनिधीची गरज आहे आणि ती आपण जबाबदारीने सोडविण्याचा प्रयत्न करु’’, असे प्रतिपादन डॉ.सुजय विखे यांनी केले.

सप्तपदी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमेळाव्यात डॉ.सुजय विखे बोलत होते. समवेत माळीवाडा तरुण मंडळाचे अध्यक्ष नीलेश खरपुडे, आबीद हुसेन, धनंजय जाधव, निखील वारे, बाळासाहेब पवार, डॉ.हनीफ शेख आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. विखे म्हणाले, “शहराचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहे. परंतु सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील वादात कामे होताना दिसत नाहीत. केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना शहरी भागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी आहे. त्याचा पाठपुरावा लोकप्रतिनिधींनी करुन त्याचा लाभ सर्वसामान्यांना मिळू दिला पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्नशील राहू.’’ याप्रसंगी आबीद हुसेन, डॉ.हनीफ शेख यांनी मनोगत व्यक्त केले.