Breaking News

राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धेसाठी चार विद्यार्थ्यांची निवड


जामखेड ता/प्रतिनीधी : अहमदनगर जिल्हास्तरीय बुध्दीबळ स्पर्धेत 13 वर्षे वयोगटातून चार जणांची निवड राज्यस्तरीय बुध्दीबळ स्पर्धेसाठी झाली आहे. जिल्हास्तरीय बुध्दीबळ स्पर्धेतून विजयी ठरलेल्या मुलींच्या गटातून जामखेड येथील रिया सुपेकर व मानसी चकोर तर मुलांच्या गटातून अहमदनगर येथील ध्रुव दुसूंगे व चैतन्य पांढरकर यांचा समावेश आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेत एकूण 46 खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. दि.15 ते 18 एप्रिल रोजी रोजी पनवेल येथे राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे.

शहरातील लोकमान्य वाचनालयाच्या कै. हरकचंद गुगळे यांच्या स्मरणार्थ जामखेड तालुका बुध्दीबळ संघटनेच्यावतीने अहमदनगर जिल्हा 13 वर्षे वयोगट जिल्हा निवड स्पर्धा रविवारी संपन्न झाल्या. जिल्हास्तरीय बुध्दीबळ स्पर्धेचे उद्घाटन एच.यु गुगळे फौंडेशनचेे अध्यक्ष रमेश गुगळे यांनी केले. या कार्यक्रमास बुध्दीबळ खेळाचे राष्ट्रीय पंच सागर गांधी, सेवानिवृत्त प्राचार्य आयुबखान पठाण, डॉ. सुहास सुर्यवंशी, डॉ. सचिन काकडे, सुनिल जगताप, नितीन राऊत, संतोष गांधी, शितल फिरोदिया, लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. मोमीन उपस्थित होते. यामध्ये 13 वर्षे (मुली) वयोगटात रिया भागवत सुपेकर (इयत्ता पहिली) हिने प्रथम क्रमांक तर मानसी मेघराज चकोर हिने द्वितीय क्रमांक मिळवून राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत आपले स्थान निश्‍चित केले आहे. तसेच मुलांच्या गटात नगरचे ध्रुव दुसुंगे व चैतन्य पांढरकर या खेळाडूंची राज्य स्पर्धेसाठी संघात निवड झाली. सिद्धी धमाल हिने मुलीमध्ये तर आयुष वाघ याने मुलामध्ये तिसरा क्रमांक पटकावला.

त्यामध्ये 7 वर्षे वयोगटात प्रथम विराज सुहास सूर्यवंशी तर द्वितीय मिहिर नितीन राऊत यांना अनुक्रमे गोल्ड व सिल्वर मेडल मिळाले. तसेच 9 वर्षे वयोगटात प्रथम जान्हवी सुहास सूर्यवंशी तर द्वितीय अर्हम प्रितम बोरा यांना अनुक्रमे गोल्ड व सिल्वर मेडल मिळाले. तसेच 11 वर्षे वयोगटात प्रथम गीत महेश भंडारी तर द्वितीय दानिशखान नासीरखान पठाण यांना अनुक्रमे गोल्ड व सिल्वर मेडल मिळाले.