Breaking News

कराड नगरपरिषदेकडून हत्तीवरून साखर वाटप


कराड/प्रतिनिधी : स्वच्छ सर्व्हेक्षण 2019 मध्ये एक लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या नगरपरिषदांमध्ये कराड नगरपरिषदेने भारतात प्रथम क्रमांक पटकाविल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी शहरात जल्लोष मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत नगरपरिषदेने भारतात प्रथम क्रमांक मिळविल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ हत्तीवरून साखरवाटप करण्यात आले.

शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता येथील कोल्हापूर नाक्यावरील महात्मा गांधी पुतळ्यापासून जल्लोष मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. हत्ती, घोडे, रथ, वाजंत्री, स्वच्छतेचा संदेश देणार्‍या नगरपरिषदेच्या घंटागाड्या असे मिरवणुकीचे भव्य स्वरूप होते. गांधी पुतळा ते पोपतभाई पेट्रोल पंप, शहर पोलीस ठाणे, शाहू चौक, दत्त चौक, आझाद चौक, नेहरू चौक, चावडी चौक, प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ, येथून परत चावडी चौक, कन्या प्रशाला, जोतिबा मंदिर ते नगरपरिषद असा मिरवणूकीचा मार्ग होता. या मिरवणुकीत पारंपरिक वेशात सहभागी झालेले पुरुष, महिला, सर्व कर्मचारी, जेष्ठ नागरिक सहभागी झाले होते.