Breaking News

कुशल कामांचे दोन कोटी २८ लाख थकित


रत्नागिरी: फळबाग लागवड योजनेअंतर्गत जिल्ह्यात चांगल्या प्रकारे लागवड करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यात ३,२०५ हेक्टरवर आंबा, काजूची रोपेलावण्यात आली आहेत. त्यावर सुमारे दोन कोटी २८ लाख रुपये कुशल कामांसाठी खर्च आला आहे; मात्र निधीअभावी कुशल कामावर झालेला खर्च अद्यापहीसंबंधित शेतकऱ्यांना मिळालेला नाही.

जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती आणि हवामान पोषक असल्यामुळे फळबाग लागवड योजना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून हाती घेण्यातआली. पहिल्या वर्षी पाच हजार तर चालू आर्थिक वर्षात ३,२०५ हेक्टरवर लागवड शेतकऱ्यांनी केली. दोन वर्षांत दहा हजार हेक्टरचे लक्ष्य होते. सामाजिक वनीकरणविभागासह महसूल आणि कृषी विभागाला यात समाविष्ट केले होते. फळझाड लागवड योजनेत सहभागी होणाऱ्या लाभार्थ्यांना आवश्यक रोपे नजीकच्यारोपवाटिकांमार्फत घेण्याची व्यवस्था करण्यात आली होती. लागवडयोग्य जागा जास्त आणि रोपे कमी अशी स्थिती होती. काहींनी वेंगुर्ले (जि. सिंधुदुर्ग) येथूनकाजूची रोपे मागविली. त्यामध्ये सर्वाधिक जागेवर काजूची लागवड करण्यात आली आहे.

लागवड करण्यासाठी अकुशल कामांवर या आर्थिक वर्षात १८ कोटी रुपये खर्च झाले. त्यामधून अनेक लोकांना रोजगार मिळाला; मात्र रोपांची खरेदी केल्यानंतरत्यावर झालेला खर्च देण्यासाठी शासनाकडे निधीचा अभाव आहे. त्यासाठी दोन कोटी २८ लाख रुपयांची गरज आहे. हा निधी थेट संबंधित लाभार्थ्यांच्या बँकखात्यात वर्ग केला जातो. त्यासाठी आवश्यक कार्यवाही रोजगार हमी योजना विभागाकडून करून ठेवण्यात आली आहे. निधी आल्याचा संदेश मिळाल्यानंतर तोतत्काळ लाभार्थ्यांना दिला जाणार आहे. रोपांची लागवड करून सहा महिने झाले तरीही रोपांचे पैसे देण्यात दिरंगाई होत आहे.