Breaking News

अग्रलेख - संशयकल्लोळ


‘जैश ए मोहम्मद’ चा म्होरक्या मसूद अझहर याच्या बाबतीत पाकिस्तानमधून जी उलटसुलट विधान येत आहेत ती पाहता जगाच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिसते. भारतीय संसदेवर हल्ला, पुरी, पठाणकोटसह अन्य ठिकाणी ‘जैश ए मोहम्मद’ने केलेली दहशतवादी कृत्ये पाहता मसूद अझहरला फाशीची शिक्षाच व्हायला हवी. त्याचा ताबा भारताकडे द्यावा, अशी मागणी वारंवार केली जात आहे. ‘मोस्ट वाँटेड’ दहशतवाद्यांच्या यादीत त्याचे नाव आहे. या संघटनेची खाती गोठवून तिच्यावर कारवाई करण्यासाठी भारत प्रयत्न करीत असताना आतापर्यंत चीनने कायम आडमुठी भूमिका घेऊन त्याची पाठराखण केली. चीनच्या जिनजियांग प्रांतात अतिरक्यांचा धुमाकूळ चालू असतो. अफगाणिस्तान आणि अन्य देशांतून अतिरेकी त्या प्रांतात जाऊ नये, म्हणून चीन एकीकडे प्रयत्न करीत असताना दुसरीकडे मात्र भारतात दहशतवादी कृत्ये करणार्‍यांना पाठिशी घालतो, ही त्याची दुटप्पी भूमिका आहे. पुलवामा येथे घातपाती हल्ला करून भारतातील केंद्रीय राखीव दलाच्या 40 जवानांचे प्राण गेले. त्यामुळे भारतात संतप्त भावना आहे. भारताच्या या भावनांची जगभर दखल घेतली गेली. अमेरिकेने तर भारताला संरक्षणाचा अधिकार आहे, असे सांगून अप्रत्यक्षपणे पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करा, अशी मोकळीच आपल्याला दिली. फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आदी देशांनीही भारताची पाठराखण केली. त्यामुळेच ‘जैश ए मोहम्मद’चे तळ असलेल्या बालकोटवर आपण ‘एअर स्ट्राईक’ केले. अगोदर तर असे काही झालेच नसल्याचा आव पाकिस्तानने आणला. पाकिस्तानच्या नागरी भागात असलेले ‘जैश ए मोहम्मद’चे तळ आपण लक्ष्य केले नाहीत. त्याचे कारण पाकिस्तानातील सामान्य नागरिकांना या हल्ल्याची झळ पोचू नये, हा आपला प्रयत्न होता. आपल्या अचूक लक्ष्यभेदाची जगाने दखल घेतली. त्यावर फारशी टीका कुणीच केली नाही. भारत अजूनही हल्ले करू शकतो, अशी भीती ‘जैश ए मोहम्मद’ सह सर्वांनाच आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये आंतकवादी हल्ल्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहे. भारतीय लष्कराने सुरू केलेली सीमेच्या आतली आणि सीमेच्या पलीकडची मोहीम लक्षात घेतली, तर भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि आपली लष्करी, आर्थिक ताकद भारताचा प्रतिकार करण्याऐवढी नाही. शिवाय सध्याचे जागतिक वातावरण पाहता उत्तर कोरिया, इराणसारखी आर्थिक बंधने जगाने लादली, तर काय करायचे, असा पेच पाकिस्तानपुढे आहे. त्यामुळे उघड युद्धापेक्षा ‘प्रॉक्सी वॉर’ करण्यात पाकिस्तानला रस आहे. त्यामुळे तर ‘जैश ए मोहम्मद’वर कारवाई करायचे नाटक करायचे आणि मसूद अझहरबाबत वावड्या उठवायच्या, ही पाकिस्तानची खेळी आहे.
पाकिस्तानचे लष्कर तेथील माध्यमांना हाताशी धरून अशा खोटया बातम्या पेरण्याचे आणि त्यानंतर पुन्हा खुलासे करून संभ्रम वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. मसूद अझहरची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे, तो घरातून बाहेर पडेल, अशी स्थिती नाही, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री सांगत होते. आतापर्यंत अझहर कुठे आहे, असे सांगण्यास टाळाटाळ करणार्‍या पाकिस्तानने आता अझहर पाकिस्तानात आहे, हे तरी मान्य केले. बालाकोट येथील ‘जैश ए मोहम्मद’ च्या तळावर अझहर दहशतवाद्यांचे ‘बौद्धिक’ घेतो, त्यांचे मन भारताविरुद्ध दहशतवादी कृत्ये करण्यासाठी तयार करायचे,यावर त्याचा भर असतो. बालाकोट येथील मदरशात अशी कामे चालायची. त्यासाठी चार इमारती बांधण्यात आल्या होत्या. दहशतवाद्यांची राहण्याची व्यवस्थाही तिथेच होती. भारताने नेमका तिथेच हल्ला केल्याने त्यात अझहरही जखमी झाला असल्याची शक्यता व्यक्त होत होती. जखमी अवस्थेतील अझहरला पाकिस्तानच्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तशा बातम्याही पाकिस्तानातून येत होत्या. अमेरिकेने जसा ओसामा बिन लादेनचा ओबाटाबादमध्ये घुसून निप्पात केला, तसा भारतही करू शकतो, अशी भीती पाकिस्तानला वाटायला लागली होती. भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेच्या बदल्यातही कोणताही तडजोड करायला भारत तयार नव्हता, यावरून भारत किती आक्रमक झाला आहे, याची कल्पना पाकिस्तानला आली होती. लष्करी रुग्णालयावर भारताने हल्ला केला, तर पाकिस्तानची उरलीसुरली अब्रूही जायची. त्यामुळे पाकिस्तानी माध्यमांतून रविवारी अझहरच्या निधनाच्या बातम्या पेरण्यात आल्या. दहशतवादी क्रूरकर्मा अझहरच अस्तित्वात नसेल, तर भारत हल्ला कशाला करेल? जगही अशावेळी भारताची साथ देणार नाही, असे वाटून तेथील लष्कराने मुद्दाम अझहरच्या मृत्यूच्या वावड्या उठविल्या. त्याच्या निधनाच्या बातम्यानंतर काय प्रतिक्रिया येतात, हे अजमावण्याचाही कदाचित पाकिस्तान प्रयत्न करीत होता. अझहरच्या मृत्यूच्या बातम्या आल्या, तेव्हाच भारतीय गुप्तचर संस्था तसेच भारतीय लष्कराने त्याबाबत शंका घ्यायला सुरुवात केली होती. अखेर ती शंका रास्त ठरली. भारताचा सर्वात मोठा शत्रू मसूद अझहर जिवंत असल्याचे आता पाकिस्तानी माध्यमे म्हणत आहेत. हीच माध्यमे रविवारी मात्र अझहरचा मृत्यू झाल्याचे सांगत होती. अगोदर त्याच्यावर किडन्या आणि यकृताच्या विकाराचे उपचार चालू आहेत, असे सांगितले जात होते आणि नंतर मात्र तो भारताच्या ‘एअर स्ट्राईक’मध्ये जखमी झाल्याने त्याच्यावर उपचार केले जात आहेत, अशी परस्परविरोधी माहिती पसरविली जात होती. ‘जैश ए मोहम्मद’ चे भारताच्या हल्ल्यात कोणतेही नुकसान झाले नाही. एकही व्यक्ती मारली गेली नाही, असे सांगण्यात येत होते. नंतर मात्र अझहरच्या भावानेच ‘जैश ए मोहम्मद’
चे मोठे नुकसान झाल्याचे म्हटल्याने पाकिस्तानचे पितळ उघडे पडले.


पाकिस्तानी लष्कराने रविवारी संध्याकाळी 7.30 च्या सुमारास मसूदला रावळपिंडी येथील रुग्णालयातून बहावलपूरमधील गोथ गन्नी येथील ‘जैश ए मोहम्मद’च्या तळावर हलवले असे आता म्हटले जात आहे. ‘जैश ए मोहम्मद’चा बहावलपूर येथे मोठा तळ आहे. भारताने या तळावर हल्ला न करता बालाकोट निवडण्यामागेही कारण होते. हा तळ नागरी भागात असून तिथे हल्ले केले, तर त्याची पाकिस्तानातील सामान्य नागरिकांना मोठी झळ पोचेल. नागरी भागातील हल्ल्याची जगभरातून भारताविरोधात प्रतिक्रिया येईल. पाकिस्तानला तेच हवे आहे, म्हणून तर अझहरची आता बहावलपूरनजीकच्या ‘जैश ए मोहम्मद’ च्या तळावर रवानगी केली आहे. अझहरला दुसर्‍या ठिकाणी हलवल्यानंतर लगेचच ‘जैश ए मोहम्मद’ने इम्रान खान सरकारवर भारत आणि आंतरराष्ट्रीय समूहाच्या दबावासमोर झुकल्याचा आरोप केला आहे. यावरून ‘जैश ए मोहम्मद’ आणि पाकिस्तानी सरकार करीत असलेली धूळफेक लक्षात यायला हवी. अझहर जिवंत असून त्याची प्रकृती चांगली आहे. भारतीय हवाई दलाने बालाकोटमधील आमच्या तळावर हल्ला केला; पण त्यात जीवितहानी झाली नाही असे ‘जैश’कडून सांगण्यात आले. पुलवामा हल्ल्यानंतर ‘जैश’ने लगेचच या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर भारताकडून बालाकोटमधील ‘जैश’च्या तळावर ‘एअर स्ट्राइक’ करण्यात आला. पाकिस्तानचे सरकार मात्र पुलवामा हल्ल्याशी ‘जैश ए मोहम्मद’ चा काहीही संबंध नाही, त्या संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली नाही, असे सांगून हात झटकण्याचा प्रयत्न केला होता. 1999 साली कंदहार विमान अपहरणात भारताने सोडलेला दहशतवादी हा मसूद अझहरच होता. पुलवामा येथील‘जैश ए मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने केला होता. आदिल भट्ट याला आत्मघाती हल्ला करण्यासाठी मौलाना मसूद अझहर याने तयार केले होते. इतकेच नव्हेतर बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण तळावर असे 45 आत्मघाती दहशतवादी या मौलाना अझहरने तयार केले होते. ते सर्व भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत होते. अशा दहशतवाद्याला सामान्य मृत्यू आला, तर त्यावर भारताचे समाधान होणार नाही. ‘जैश ए मोहम्मद’ची पाळेमुळे गाडण्यासाठी आणखी व्यापक मोहिमेची गरज आहे आणि ती करण्याच्या तयारीत आता भारत आहे. पाकिस्तानने कितीही संशयकल्लोळ केला, तरी त्यातून मार्ग काढण्याची ताकद भारतीय सुरक्षा यंत्रणेत आहे.