Breaking News

कुकडी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी


पारनेर/प्रतिनिधी : कुकडी डाव्या कालव्यातून 15 मार्च पुर्वी पाणी सोडण्यात यावे अशा मागणीचे निवेदन कुकडी डावा कालवा लाभक्षेत्रातील नागरिकांनी विधानसभा उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्याशी चर्चा करून दि.4 रोजी दिले.

कुकडी डाव्या कालवा वगळता या प्रकल्पातील सर्व कालवे व नदीला 5 मार्च पासून पाणी सोडण्याचा निर्णय दि.2 मार्च रोजीच्या बैठकीत घेण्यात आला. हा निर्णय पारनेर तालुक्यातील कुकडी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील जनतेसाठी अन्यायकारक आहे. या क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याची, जनावरांच्या चार्‍याची, व उरल्या सुरल्या फळबागांची परिस्थिती फार बिकट आहे. या परिसरातून तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. परंतु आवर्तन न आल्याने हे उद्भव कोरडे पडले आहेत. जणावरांसाठी केलेली चारा पिके जळून गेली आहे. व वर्षोनुवर्षे जगवलेल्या फळबागा पाण्याअभावी अखेरच्या घटका मोजत आहे. पशुधन वाचविण्याचा मोठा प्रश्‍न जनते समोर आहे. 

10 एप्रिल नंतर पाण्याचे आवर्तन सोडण्याच्या निर्णयाने या पाण्यावर अवलंबून असणारी जनता हवालदिल झाली आहे. दुष्काळाचा सामना कसा करावा असा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा आहे. पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा व फळबाग कशी जगवावी या विवंचनेत तो आहे. 

कुकडी प्रकल्पात डाव्या कालव्यातून पाणी सोडता येईल एवढे जवळजवळ 9 हजार 689 दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. यात प्रामुख्याने डिंबे धरणात 4422 दशलक्ष घनफूट (35%), माणिकडोह धरण 10204 (48%), येडगाव धरण 934 (48%), वडज 256 (22%) व पिंपळगाव जोगा कालव्यातून पाणी सोडल्यानंतर डाव्या कालव्यासाठी 3 टि.एम.सी. पाणी सोडले जाऊ शकते. उपलब्ध पाण्याची परिस्थिती पाहता येडगाव मधील पाणी साठा, माणिकडोह मधून उपलब्ध होणारे पाणी 1000 क्युसेक ने डावा कालव्याचे आवर्तन 15 मार्च पुर्वी सुरू केले जाऊ शकते व नंतर पिंपळगाव जोगाचे पाणी येडगावमध्ये घेऊन आवर्तन सलग करता येईल.
कुकडी डाव्या कालव्यातून पाणी सोडल्यानंतर अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न, जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न सुटेल अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना या कालव्यावर अवलंबून आहेत. फळबागांना जीवदान मिळेल. परिस्थिती पहाता कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन 15 मार्च पुर्वी सोडावे अशा आशयाचे निवेदन दिले आहे. व पाणी लवकर सोडण्याची मागणी केली आहे.

हे निवेदन देताना जवळा गावचे उपसरपंच किसनराव रासकर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव कॉ. संतोष खोडदे, किसान सभेचे तालुका सचिव कॉ.कैलास शेळके, रमेश वरखडे, संदिप सालके, प्रदिप सोमवंशी, संतोष पठारे, संतोष सालके, भाऊसाहेब पठारे, अरुण सालके, दौलत बढे, प्रकाश लोखंडे, गोरख सालके, सुभाष पठारे, रंगनाथ ढवन, शरद घोगरे, ज्ञानदेव सालके, बाळासाहेब सालके, प्रभाकर पठारे आदी व शेतकरी उपस्थित होते.