Breaking News

लोकसभा निवडणूक पूर्वपिठीका पुस्तिकेचे प्रकाशन


सातारा / प्रतिनिधी : जिल्ह्यातील लोकसभा मतदार संघांच्या 1952 पासूनच्या आकडेवारीची अचूक माहिती तसेच निवडणूक विषयक विविध संपर्क क्रमांक असलेली ’ 45- सातारा मतदार संघ निवडणूक 2019 पूर्वपिठीका’ ही पुस्तिका प्रसार माध्यमांना व अभ्यासकांना निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या 45- सातारा मतदार संघ निवडणूक 2019 पुर्वपिठीकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल यांच्या हस्ते त्यांच्याच कक्षात करण्यात आले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी पुनम मेहता, जिल्हा कोषागार अधिकारी धनाजी शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी सचिन जाधव आदी उपस्थित होते.

या पुस्तिकेमध्ये 1952 पासूनच्या लोकसभा निवडणूकांची आकडेवारी अचूक देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच लोकसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने काय करावे, काय करु नये, माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीचे तिचे कार्य, आदर्श आचार संहिता, आदी महत्वपूर्ण माहिती या पुस्तिकेत आहे. तसेच मतदार संख्या, निवडणूक विषयक महत्वाचे दूरध्वनी, निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकार्‍यांचे दूरध्वनी आदी संपर्क दूरध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत.