कराडच्या उपसभापतीची अधिकार्‍यांना अर्वाच्च भाषा


कराड / प्रतिनिधी : पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या सर्वच विभागाच्या अधिकार्‍यांकडून कोणत्याही शासकीय योजनांच्या लाभार्थींची यादी ठरवताना मनमानी केली जाते. पंचायत समिती सदस्यांना अंधारात ठेवले जात असल्याचा आरोप करत असताना उपसभापती सुहास बोराटे यांनी अधिकार्‍यांना उद्देशून अर्वाच्च भाषेचा वापर केल्यामुळे सभागृह अवाक झाले. उपसभापतींनी मर्यादा भंग केल्याच्या प्रतिक्रिया अनेक अधिकार्‍यांकडून व्यक्त केल्या जात होत्या.

पंचायत समिती मासिक सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती फरीदा इनामदार होत्या. यावेळी गटविकास अधिकारी आबासाहेब पवार उपस्थित होते. पशुधन विभागाच्या कामाचा आढावा सादर केला जात असताना उपसभापती बोराटे यांनी, या विभागासह सर्वच विभागांचे अधिकारी पंचायत समिती सदस्यांना विश्र्वासात न घेता काम करत असल्याचा आरोप केला. लाभार्थी ठरवण्याचे अधिकार अधिकार्‍यांना कोणी दिला, असे विचारत त्यांनी दम भरण्यास सुरुवात केली. बोराटे यांच्या भावना कितीही योग्य असल्या तरी त्यांनी सभागृहात एका जबाबदार पदावर बसले असताना वापरलेली भाषा योग्य नाही, अशी कुजबूज सभागृहात उपस्थित अधिकार्‍यांच्याकडून केली जात होती. त्यानंतर सुरेखा पाटील यांनीही आपणांस अधिकार्‍यांच्याकडून कोणत्याही योजनांबाबत माहिती नसल्याचे सांगितले. शरद पोळ यांनी कोणत्याही शासकीय योजनेचे लाभार्थी ठरवत असताना पंचायत समिती सदस्यांचे शिफारसपत्र जोडणे आवश्यक बनवावे, अशी मागणी केली.

आरोग्य विभागाच्या कामाचा आढावा सादर करत असताना तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांनी बनवडीतील डेंग्यू तसेच साथीच्या आजारांविषयी माहिती दिली. बनवडीत डेंग्यूप्रतिबंधक औषध फवारणीबरोबरच फॉगींगचीही फवारणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. सुपने येथील आरोग्य उपकेंद्राबाबतच्या तक्रारींचा अहवाल तयार करुन तो जिल्हा वैद्यकीय अधिकार्‍यांच्याकडे पाठवला असल्याची माहितीही त्यांनी दिली.

शरद पोळ यांनी प्राथमिक शिक्षकांच्या संगणकीय ज्ञानाबाबत साशंकता उपस्थित करताना त्यांची याबाबत फेरचाचणी घेण्याची मागणी केली. शिक्षकांकडे संगणक साक्षरतेबाबत एमएससीआयटीचे प्रमाणपत्र आहे. परंतू अशा शिक्षकांना सीपीयू आणि मॉनिटरमधील फरकही समजत नाही.

अंगणवाडी विभागाचा आढावा सादर केला जात असताना, रमेश देशमुख आणि शरद पोळ यांनी अधिकार्‍यांनी केवळ रिक्त जागांची माहिती न देता अंगणवाडीत शिकणार्‍या मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत अहवाल सादर करावा अशी मागणी केली. अंगणवाडी सेविकांचा सगळा वेळ भात शिजवणे आणि खाउ वाटपातच जात असल्यामुळे पहिलीमध्ये प्रवेश करणार्‍या मुलांचा शैक्षणिक पायाच कच्चा राहतो. त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी पहिली सहा महिने आकारचे तर पुढील सहा महिने मुलांना अक्षरओळख शिकवावी, अशी मागणीही शरद पोळ यांनी केली.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget