Breaking News

हिंदू एकताच्या प्रांतीय अध्यक्षपदी पावसकर


कराड, (प्रतिनिधी) : हिंदू एकता आंदोलन समितीच्या प्रांतीय अध्यक्षपदी विनायक पावसकर यांची, तर कोल्हापूरचे प्रांतसरचिटणीसपदी दीपक मगदूम व प्रांत खजिनदारपदी चंद्रकांत जिरंगे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. 

कराड येथे हिंदू एकता आंदोलनाच्या महाराष्ट्र प्रदेशची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संघटनेची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विविध जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत विनायक पावसकरांची प्रांतीय अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. 

पावसकर म्हणाले, दहशतवादी हल्ल्‌यांच्या पार्श्र्वभूमीवर देशातील हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. परंतु, या सर्व संघटनांची हिंदू एकता आंदोलन ही जनक संघटना असून राष्ट्रहिताचा संदेश तळागाळापर्यंत प्रभावीपणे पोहचवण्याचे काम हिंदू एकता आंदोलनाने केले आहे. मात्र, या संघटनेचे नाव वापरून काहींनी राजकीय पक्ष स्थापन करण्याचा प्रयत्न केला असून या पक्षाला कोणत्याही प्रकारची मान्यता देण्यात आलेली नाही. त्यामुळे संघटनेचे नाव वापरून राजकीय पक्ष स्थापन करणार्‍यांची चौकशी करण्याची मागणी करणार असून या पक्षाशी हिंदू एकता आंदोलनाचा कसलाही संबंध नाही. तसेच या बैठकीत नवीन कार्यकारिणीही गठीत करण्यात आली आहे. 

त्यामध्ये प्रांतीय अध्यक्षपदी विनायक पावसकर (कराड), प्रांत सरचिटणीसपदी दीपक मगदूम (कोल्हापूर) व प्रांत खजिनदारपदी चंद्रकांत जिरंगे यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच प्रांत सदस्यपदी सातारा जिल्ह्यातून उमेश साळुंखे, रुपेश मुळे, शिवाजी जाधव, महेश जाधव, दत्ता क्षीरसागर, सांगली जिल्ह्यातून दत्तात्रय भोकरे, प्रभाकर चौगुले, परशुराम चौगुले व कोल्हापूर जिल्ह्यातून सुभाष पोतदार, सुरेश इंगळे व शिवाजी भोसले यांची निवड करण्यात आली आहे.