Breaking News

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर परवानाधारक दारू दुकाने बंद करण्याचे आदेश


शिरूर/प्रतिनिधी: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांची पाळेमुळे उखडून टाकण्याचा पवित्रा रांजणगाव पोलिसांनी घेतला आहे. स्थानिक ग्रामस्थ पोलिसांना मदत करत आहेत. आचारसंहिता काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, ही सतर्कता रांजणगाव पोलिसांनी घेतली आहे. 
 
कारेगाव गावच्या ग्रामस्थांनी अवैद्य दारू धंद्यांबरोबर परवानाधारक दारू विक्री दुकाने बंद व्हावेत. याकरिता निवेदन दिले होते. रांजणगाव पोलिसांनी कारेगाव गावच्या ग्रामस्थांच्या मागणीला खरे उतरून रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांवर धडक कारवाई करून हॉटेल चालक व जागा मालक त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. तसेच जिल्ह्यातील पहिलीच कारवाई म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. असे काम रांजणगाव पोलिसांनी केले आहे. कारेगावकरांच्या मागणीप्रमाणे रांजणगाव पोलिसांनी योग्य तो पत्रव्यवहार पाठपुरावा करून माननीय जिल्हाधिकारी पुणे यांचेकडून कारेगाव ग्रामपंचायत हद्दीतील परवानाधारक दारू विक्री दुकाने आचारसंहिता काळात 25 मे 2019 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश प्राप्त करून घेतले आहेत. सदर कारवाईबाबत रांजणगाव पोलिसांचे वेगवेगळ्या स्तरातून ग्रामस्थांकडून प्रामुख्याने कारेगाव गावातील रांजणगाव एमआयडीसीतील महिला वर्गाकडून कौतुक केले जात आहे.

आगामी लोकसभा निवडणूक 2019 अनुषंगाने रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेताना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर लक्ष ठेवावे, तडीपार प्रकरणे, फरार गुन्हेगार यांच्याबाबत नियमित कारवाई सुरू ठेवावी. अजामीनपात्र वॉरंटचा आढावा घ्यावा. शस्त्र परवान्याचा आढावा घेऊन शस्त्र जमा करून घ्यावेत. अवैध शस्त्रांचा वापर होणार नाही, अवैध दारू विक्री होणार नाही, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही. यासाठी दक्षता घ्यावी. सामाजिक दृष्ट्या कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपयुक्त उपाय योजना कराव्यात. तसेच निवडणूक आयोगाकडून दिल्या जाणार्‍या निर्देशांकडे लक्ष ठेऊन त्यांचे काटेकोर पालन होईल, याची दक्षता घेण्याबाबत पोलिस निरीक्षक मनोज कुमार यादव रांजणगाव पोलिस स्टेशन यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांना सांगितले आहे.