Breaking News

बोलावणे आल्याशिवाय नाही...


कोणीही कितीही युती-आघाडीच्या घोषणा केल्या, बसता उठता नाव घेतले तरी ऐन रणधुमाळीत एक साधीशी चूक राजकीय वैमनस्य वाढवण्यास पुरेशी ठरते हे आजवर आपण अनेकवेळा पाहिले असेल. भाजप-शिवसेना आणि मित्रपक्षाने या निवडणुकीसाठी आपली युती जाहीर केली असली तरी मित्रपक्षांपैकी गेली साडेचार वर्षे तडजोडीचा संसार करणार्‍या आरपीआयला भाजपाने थेट नाराजांच्या गटात ढकलल्याने नाहीतर म्हटले तरी आठवलेेंंना मानणार्‍या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत संतप्त भावना धुमसत आहेत. याला सातारा जिल्हाही अपवाद नाही. 

 सातारा जिल्ह्यात खासदार उदयनराजेंना टक्कर देण्यासाठी महायुतीने नरेंद्र पाटील यांच्यासारखे माथाडी कामगारांचे खंदे नेतृत्व उभे केले आहे. महायुतीच्या घटकपक्षामध्ये आरपीआयचाही समावेश असल्याने खासदार उदयनराजेंसारख्या बलाढ्य उमेदवाराला पराभूत करण्यासाठी युतीला मित्रपक्षांची मदत लागणारच आहे. प्रचारासह पुढील रणनिती ठरवण्यासाठी बोलावलेल्या जिल्हयातील प्रमुखांमध्ये आरपीआयच्या जिल्हाध्यक्षांचाही समावेश होता. मात्र त्यांना केवळ मोबाईलवरुन या बैठकीची कल्पना देण्यात आली. सातारा जिल्हा आरपीआयच्या जिल्हाध्यक्षांची आतापर्यंतची कारकिर्द पाहता केवळ मोबाईलवरील निरोपाने धावत जावून स्टेजवर विराजमान होणार्‍यापैकी ते नाहीत हे माहित असूनही त्यांना बेमालूमपणे डावलण्यात आले. बैठकीत वारंवार मित्रपक्षांच्या यादीत आरपीआयचा उल्लेख होत असला तरी त्या बैठकीला आरपीआयचा एकही प्रमुख तर सोडाच साधा कार्यकर्ताही हजर नव्हता. 

विशेष म्हणजे या बैठकीत व्यासपीठाच्या पाठीमागे लावण्यात आलेल्या फ्लेक्सवरही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो नव्हता. भाजपाच्या जिल्हाध्यक्षांसह उमेदवार नरेंद्र पाटील यांनीच केवळ डॉ. बाबासाहेबांचे नाव घेत समयसूचकता दाखवली. अन्य वक्ते ते नाव सोयिस्करपणे विसरले की त्यांची वैचारिक उंचीच तेवढीच होती हे मात्र कळाले नाही. बैठकीत झालेल्या विविध विषयांवरील चर्चेत केवळ दोन प्रमुख पक्षांची ध्येयधोरणे आणि रणनिती यावरच चर्चा करण्यात आली. आपल्या मित्रपक्षांना सोबत घेण्याचे व त्यांच्या कार्यकर्त्यांनाही सामावून घेण्यासंदर्भात कोणीही वाच्यता केली नाही. याचा अर्थ रिपाइ, रासप व मित्रपक्षांना त्यांनी गृहीत धरुन ही निवडणूक लढवण्याचे ठरवले असल्याचे दिसत आहे.यावर इतर कोणत्या मित्रपक्षाने नव्हेतर रिपाइसारख्या आक्रमक पक्षाच्या जिल्हाध्यक्षाने मात्र नेहमीप्रमाणे आपल्या शैलीत बोलावणे आल्याशिवाय जाणार नाही असा इशारा प्रतिक्रिया देताना दिला. यावरुन महायुतीच्या एका पक्षाचे रुसवे फुगवे सुरु झाले की, महायुतीतील मोठ्या पक्षांनी मित्रपक्षांना गृहीत धरण्याचे धोरण अवलंबले आहे हे कळण्यास मार्ग नाही. रिपाइच्या जिल्हाध्यक्षांना संबंधित बैठकीच्या आयोजकांनी मोबाईलवरुन आमंत्रण दिले होते. जिल्हाध्यक्षांची आजवरची प्रतिमा पाहता त्यांना केवळ मोबाईलवरुन बोलावले तरी ते येतील असे गृहीत धरणे हाच बालीशपणा आहे. त्यांना निमंत्रण देणाराही सातारा जिल्ह्यातीलच असणारा आहे. मग त्याने ही चूक जाणूनबुजून केली की, येणारच नाहीत मग औपचारिकता पाळावी यादृष्टीकोनातून केवळ मोबाईलवरुन निमंत्रण दिले हे कळाले नाही. एकूण महायुतीच्या पहिल्याच प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत झालेला हा मानापमानाचा खेळ असाच सुरु राहिला तर उदयनराजेंसारख्या बलाढ्य उमेवाराला महायुतीचा उमेदवार कसा टक्कर देणार असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. 

 कदाचित नरेंद्र पाटील ज्या माथाडी कामगारांचे नेतृत्व करतात त्या माथाडी कामगारांची संख्या पाहता मित्र पक्षांना जमेला धरले नाहीतरी काहीही बिघडत नाही असा समजही झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूण निवडणुकीचा फॉर्म भरण्याअगोदरच सुरु झालेले मित्रपक्षांच्या हेवेदावे थेट निवडणुकीवर काय परिणाम करतात हे मतदान झाल्यानंतर निवडणुकीच्या निकालादिवशीच कळणार आहे. तोपर्यंत मानापमान नाट्यातील नायक कोण आणि खलनायक हे कळणे दुरापास्त आहे एवढे मात्र निश्चितच.