Breaking News

आतबट्ट्याच्या शेतीला ड्रँगन फ्रुटचा आधार


खटाव,  (सदानंद जगताप । लोकमंथन वृत्तसेवा) : वातावरणातील बदलामुळे समाजजीवनातील प्रत्येक घटकांवर काही ना काही निसर्गाची अवक्रुपा होत आहे. सातत्याने बदलणार्‍या हवामानामुळे शेतकर्‍यांना दिवसेंदिवस शेती व्यवसाय करने अत्यंत अडचणिचे होऊ लागले आहे.

अशा परिस्थितीत संसाराचा गाडा चालविण्यासाठी काहीतरी मार्ग काढणे गरजेचे होते. म्हणुनच खटाव तालुक्यातील मायणीच्या दीपक शंकरराव देशमुख यांनी कानकात्रे येथे जमिन खरेदी केली. कानकात्रेतिल मुंगूसमाळ येथिल शिवारात अथक परीश्रमातुन माळरानावरील तीन एकरात त्यांनी ड्रँगन फ्रुट फळबाग फुलवली आहे

दिवसेंदिवस दुष्काळी पट्ट्यातील शेतकर्‍यांसमोरील अडचणीत वाढचं होत चालली आहे. सततच्या नैसर्गिक आपत्तीपुढे बळीराजाचेच सर्वाधिक नुकसान होताना दिसून येत आहे. वेळी- अवेळी पडणारा पाऊस, सातत्याने बदलणार्‍या हवामानामुळे शेती व्यवसाय पुर्णत: अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकर्‍याना आपले दैनंदिन जिवन जगनेही अवघड बनत चालले आहे. अशा परीस्थितीमुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. त्यामुळेच दीपक देशमुख हे या आतबट्ट्याच्या शेती व्यवसायातुन बाहेर पडण्याच्या हेतुनेच ड्रँगन फ्रुट फळबाग लागवडीकडे वळले.

फळबागेसाठी जमिन तयार करण्यापासून ते प्रत्यक्ष फळबाग लागवड, खतांच्या मात्रा देणे, औषध फवारणी असा पहिल्या वर्षी प्रथमिक खर्च साधारण चार लाख 46 हजारापर्यंत आला.

सन 2016-17 मध्ये त्यांनी या नविन प्रयोगाला सुरवात केली. दुष्काळी भाग असल्याने या पिकासाठी पाण्याचे योग्य नियोजन केले. ठिबक तंत्रज्ञानावर अधारीत ठिबक संच तिन एकरावर बसवुन पिक पाणी व्यवस्थापन केले.कोणत्याही प्रकारे फळबागेला रासायनिक खत न वापरता शेणखत व सेंद्रिय खताचा वापर करुन, आंतरमशागत,व वेळची-वेळी औषध फवारण्या करुन,प्रसंगी उधार - उसणवारी करुन फळबाग उत्तम प्रकारे जोपासली. सन 2017 मध्ये देशमुख याना चांगले उत्पन्न मिळाले. खर्च वजा जाता जवळपास त्याना साडे सहा लाखांचे उत्पन्न मिळाले व सन 2018 मध्ये आठ लाख 60 हजारांचे उत्पन्न मिळाले.

या बागेला सुरवातिला थोडा जास्त खर्च येत असला तरी ही बाग किमान पंधरा ते वीस वर्षे व्यवस्थित राहाते. लागवडीनंतर व्यवस्थापन व निगा या पलिकडे खर्च येत नसल्याने हे पिक शेतकर्‍याना वरदानच ठरत आहे.

ड्रॅगन फ्रुट ही वनस्पती निवडूंग प्रजातितील आहे . प्रथम चिनमध्ये या फळपिकावर खुप संशोधन झाले. हे फळ अँन्टिआँक्सिडंट असुन त्यात अँन्टिकंन्सर गुणधर्म आहेत. या शिवाय याचे सेवनाने कोलेस्टॉंल निंयत्रण,मधुमेह नियंत्रण, बीपी नियंत्रण व वजन कमी करुन उत्साही ऊर्जा प्राप्त करुन देण्यास साह्यीभुत ठरत असल्याने या फळाला शहरी भागातुन खुप मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याचे व दरही चांगला मिळत असल्याचे दिपक देशमुख यानी सांगितले.

नाविण्याचा शोध घेत,शुध्द व्यापारी शेती केली तरच शेती व्यवसायाचा टिकाव धरणार आहे. जर फायद्याची शेती करावयाची असेल तर सतत प्रयोगशिल बनुन नाविण्याचा शोध घेत, मार्केट सर्व्हे करुनच जो शेती करेल तोच फायद्यात राहिल असे दीपक देशमुख यांनी दैनिक लोकमंथनशी बोलताना सांगितले.