Breaking News

जैन मुनींवर झालेल्या हल्ल्याचा कर्जतला निषेध


कर्जत/प्रतिनिधी
जैन मुनी सिद्धसेन विजय महाराज व श्री भव्यघोष विजय महाराज या जैन धर्मगुरूंना शिरूर तालुक्यातील मलठण-कवठे यमाई या रस्त्याने पायी जात असताना शिरूर तालुक्यातील मुबाळवाडी येथील व्यक्तीने दारूच्या नशेमध्ये रस्त्यावर दुचाकी आडवी लावून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेचे कर्जत तालुक्यात तीव्र पडसाद उमटले. शनिवारी दुपारी अडीच वाजता येथील जैन बांधवांनी कर्जत पोलिस स्टेशनवर मोर्चा काढून तीव्र निषेध केला.

रविवारी (दि.10) दुपारी बारा वाजेपर्यंत कर्जत शहर व तालुका बंद ठेवण्याचे आवाहन जैन बांधवांच्यावतीने करण्यात आले . सत्य व अहिंसेचा प्रचार प्रसार करणार्‍या जैन संतांना पायी मार्गक्रमण करीत असताना अनेक अनिष्ट प्रवृत्तींचा त्रास सहन करावा लागतो. कवठे यमाई येथे झालेल्या प्रकाराने जैन बांधवांच्या भावना दुखावल्या असून असे कृत्य करणार्‍यावर अल्पसंख्यांक कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश माने यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी भारतीय जैन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभय बोरा, प्रसाद शहा, कर्जतचे अध्यक्ष विजय खाटेर, राशिनचे अध्यक्ष सचिन अच्छा, राकेश देसाई, महावीर बोरा, आशिष बोरा, वैभव शहा, नीलेश बोरा, प्रीतम शहा, प्रदीप मंडलेचा, अनिकेत खाटेर, योगेश शर्मा, संतोष भंडारी, प्रसाद शहा, किरण बोथरा, अतुल जैन, शुभम बोरा, गौरव अच्छा, सुजित देसाई, यांच्यासह जैन संघटनेचे विविध पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कर्जत बंदचे आवाहन

मानवतेच्या भूमिकेतून जैन मुनी सर्व समाजाच्या प्रचार-प्रसारासाठी सत्य व अहिंसेची शिकवण देण्यासाठी अनवाणी पायी प्रवास करतात. अशा साधूंवर भ्याड हल्ला करणे ही गंभीर बाब असून त्याचा जाहीर निषेध करीत आहे. भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जैन बांधवांच्यावतीने कर्जत बंद ठेवण्याचे आवाहन करीत आहोत.- अभय बोरा
जिल्हाध्यक्ष, भारतीय जैन संघटना