Breaking News

आबापुरी यात्रा नियोजनाची बैठक उत्साहात

शेंद्रे / प्रतिनिधी : जिल्ह्यातील मोठ्या यात्रांपैकी एक असणार्‍या आबापुरी-वर्णे (ता.सातारा) येथील स्वयंभू श्री काळभैरवनाथाच्या यात्रा नियोजनासंदर्भात आढावा बैठक नायब तहसिलदार कोळेकर यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच संप्पन्न झाली.

29 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीत होणार्‍या यात्रेच्या नियोजनाच्या बैठकीस बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी कारखानीस, वर्णे गणाच्या पंचायत समिती सदस्या कांचन काळंगे, सरपंच संगिता काळंगे यांचेसह संबधित विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यात्रा शांततेत पार पडावी यासाठी प्रशासन, देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांनी सहकार्यांची भमिका घेत योग्य नियोजन करावे, जेणे करून येणार्‍या भाविकांना कोणत्याही गैरसोयीचा सामना करावा लागू नये, असे तहसिलदारांनी सांगितले. यावेळी पाणी, वीज, आरोग्य, वाहतुकीची साधने व इतर बाबींकडे व्यवस्थित लक्ष द्यावे, असेही त्यांनी सांगितले. यात्रा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये व वाहतूक सुरळित चालावी यासाठी पोलिसांची जादा कुमक मागवून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी सांगितले. यात्राकाळात मंदीर परिसर व गावात स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा व स्च्छतागृहाच्या सुविधा चोखपणे पुरविल्या जातील असे ग्रामपंचायतीच्यावतीने सांगण्यात आले. येणार्‍या भाविकांसाठी योग्य व झटपट दर्शन होण्यासाठी देवस्थान ट्रस्ट सर्वतोपरी सहकार्य करील, असे ट्रस्ट व ग्रामस्थांच्यावतीने यावेळी सांगण्यात आले.
यावेळी मंडल कृषइधिकारी, तलाठी साळुंखे, उपसरपंच अशोक भोसले, ग्रामसेवक निकम, पोलिस पाटील मोरे, वीज वितरण, नांदगाव आरोग्य केंद्राचे कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, देवस्थानचे विश्र्वस्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.