Breaking News

संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकार्‍यावर जामखेडमध्ये हल्ला


जामखेड/प्रतिनिधी
संभाजी ब्रिगेडच्या अवधूत पवार या पदाधिकार्‍यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेने जामखेड तालुका हादरला आहे. या घटनेत अवधूत पवार गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर जामखेड येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी सायं 6 वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत सविस्तर असे की, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष असलेले अवधूत पवार शहरातील खर्डा रोडने जात असताना लक्ष्मीआई चौकात त्यांच्यावर 10-12 जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये पवार हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नागरिकांनी उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जखमा गंभीर असल्याने खाजगी रुग्णालयात दाखल करून तातडीने उपचार सुरू केले. हल्ल्यानंतर हल्लेखोर पसार झाले.
हल्लेखोरांनी अवधूत पवार यांच्या पायावर पाठीवर डोक्यावर जबर मारहाण केली आहे. या घटनेची माहिती शहरभर पसरताच शहरातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांसह नागरिकांनी तातडीने दवाखान्याकडे धाव घेत पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
अवधूत पवार यांच्यावर कोणी जिवघेणा हल्ला केला ? का केला ? याचा उशीरापर्यंत तपशील मिळू शकला नाही. यासंदर्भात स्थानिक पोलिसांकडूनही ठोस माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. दरम्यान अवधूत पवार यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यासंदर्भात जामखेड पोलिसांत रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.