Breaking News

संतप्त ग्रामस्थांचा पाणीप्रश्नासाठी ग्रामपंचायतवर हंडामोर्चा


श्रीरामपूर/प्रतिनिधी: श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगरमध्ये पाणीटंचाईने गंभीर रूप धारण केले असून नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. पाण्याची कमी असणारी उपलब्धता, नादुरुस्त पाईपलाईन, टँकरचे अनियोजितपणा आदी कारणामुळे पाणी प्रश्न बिकट बनला आहे. पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी एकत्र येत ग्रामपंचायतवर हंडामोर्चा काढला. यावेळी गावातील ग्रामस्थ, महिला भिमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर व सागर भोसले आदी उपस्थित होते. यावेळी ढोल ताशे वाजवत महिलांनी ग्रामपंचायत समोर ठिय्या आंदोलन करत ग्रामपंचायत कारभाराचा निषेध केला.

गंभीर बनत चाललेल्या पाणी समस्येवर उपायोजना करावी यासाठी काढलेल्या मोर्चाला उत्तर देताना सरपंच सुनील शिरसाठ, कामगार पथपेढीचे अध्यक्ष बाळासाहेब विघे यांनी पाणीप्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा यावेळी संदीप मगर , सागर भोसले, उपस्थित नागरिकांनी दिला.

भिमशक्ती जिल्हध्यक्ष संदीप मगर म्हणाले की, दत्तनगर गावांत दोन कोटींची पिण्याच्या पाणीची पाईपलाईन असून देखील सत्ताधारी पक्षाला पाण्याचे नियोजन करता येत नाही, सहा दिवस झाले पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे, ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी हातांवर हाथ ठेवले असून, परिणामी ग्रामस्थांना दैनंदिन पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. तीव्र पाणी टंचाईने ग्रामस्थांना दाहीदिशा कोसोवर भटकंती करण्याची दुर्दैवी वेळ आलेली आहे.

किंबहुना विकतचे पाणी घेऊन गरज भागवावी लागत आहे. ग्रामपंचायतकडे टँकर उपलब्ध असूनदेखील ग्रामस्थांना पाणी देता आले नाही.

यावेळी सरपंच सुनील शिरसाठ यांनी गावात पाणी टंचाई नसल्याचे स्पष्ट करत काही तांत्रिक अडचणींमुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. लांब अंतरावरून गावातील पाईपलाईन आणली असल्याने या समस्या निर्माण होतात असे सांगितले.