Breaking News

महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक


कराड / प्रतिनिधी : पुणे-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर वाठार गावच्या हद्दीत अज्ञात ट्रकने दुचाकीला धडक देऊन अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील एकजण जागीच ठार झाला असून एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी पोलिसात ट्रकचालका विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
रमेश आनंदराव पाटील (वय 55, रा. कापील, ता. कराड) असे अपघातात जागीच ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. तर विठ्ठल हारी जाधव (वय 65, रा. कापील, ता. कराड) असे अपघातात गंभीर जखमीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रमेश पाटील व विठ्ठल जाधव हे दुचाकी क्रमांक (एमएच 11 इ 5479) वरून कापीलहून बेलवडे येथे निघाले होते. पुणे-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर वाठार गावच्या हद्दीत दुपारच्या सुमारास ते दुचाकीवरून जात असता कोल्हापूरकडे जात असलेल्या अज्ञात ट्रकची धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील पाटील यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे ते जागीच ठार झाले. तर जाधव हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीससह पोलीस कर्मचारी, महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी अपघातस्थळी दाखल झाले. अपघाताची माहिती तालुका पोलिसांना देण्यात आली.