Breaking News

जामखेड तालुक्यात चोरट्यांचा धुमाकुळ--------


जामखेड/प्रतिनिधी : जामखेड तालुक्यात चोरट्यांनी धुमाकुळ घातला असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरू लागले आहे. काल पहाटे अज्ञात चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून केलेल्या घरफोडीत दीड लाख रूपयांची रोकड व दोन मोबाईल लंपास केल्याची घटना जामखेड शहरातील राळेभात गल्ली परिसरात घडली.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड शहरातील राळेभात गल्लीत अमोल भिकू राळेभात हे आपल्या कुटूंबासह राहतात. गुरूवारी पहाटे 3 वा. सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी शेजारच्या घरांच्या दरवाज्यांच्या कढ्या बाहेरून लावून घेतल्या व फिर्यादीच्या खोलीच्या खडकीचे लोखंडी ग्रिल तोडून घरात प्रवेश केला. 

यावेळी चोरट्यांनी राळेभात पती पत्नीला चाकुचा व कोयत्याचा धाक दाखवून घरातील लोखंडी कपाटाची उचकापाचक करत फिर्यादीच्या खिशातील व त्यांच्या पत्नीच्या पर्समधील रोख रक्कम व ड्रेसिंग टेबलवर ठेवलेले दोन मोबाईल बळजबरीने चोरून नेले. या घटनेत अज्ञात चोरट्यांनी एकूण एक लाख 38 हजार रूपयांची रक्कम चोरून नेल्याची फिर्याद जामखेड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश कांबळे हे करत आहेत.