Breaking News

पतंगराव कदमांच्या स्मृतींना अनोखी आदरांजली


सातारा / प्रतिनिधी : शिक्षण, सहकार, समाजकारण, राजकारण आदी विविध क्षेत्रात जिद्दीने नावलौकीक पटकावणारे डॉ. पतंगराव कदम हे एक स्वयंभू नेतृत्त्व होते. वक्तृत्त्व, कतृत्त्वाचा सुरेख संगम त्यांच्या ठायी होता. त्यांच्या कार्यकतृत्त्वाचा आदर करणारे लोक ठिकठिकाणी आहेत. केवळ राजकीय क्षेत्रातच नव्हे तर सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातही डॉ. कदम यांच्याबद्दल कमालीची आपुलकी व्यक्त होताना दिसते.

त्यांच्या अकाली जाण्याने अनेकांना धक्का बसला, मात्र त्यांची अपुरी स्वप्ने साकारण्यातूनच त्यांना आदरांजली व्यक्त व्हावी, अशी भावनाही अनेकांच्या मनात दाटून आहे. शिवथरचे जयवंत आनंदराव साबळे हे डॉ. कदमांवर निस्सीम प्रेम करणारे व्यक्तीमत्त्व. नुकत्याच झालेल्या डॉ. कदम यांच्या प्रथम स्मृतीदिनी त्यांनी त्यांच्या शिवथर येथील घरी प्रतिमापूजनासह विविध सामाजिक उपक्रम राबविले. त्यामध्ये अभिवादन, डॉ. कदम यांच्या जीवनचरित्राचा आढावा घेणारी स्वत:ची व विद्यार्थी, तरूणांची भाषणे, व्यक्तीगत स्वरूपात रक्तदान, रूग्णालय व मंदिर परिसरात फळवाटप आदी उपक्रमांचे आयोजन केले होते. त्या वेळी संतोष साबळे, ओम साबळे, सत्यम साबळे आदींसह ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचीही आवर्जून उपस्थिती होती.

वास्तविक जयवंत साबळे हे भारती विद्यापीठाच्या डॉ. जे. डब्ल्यू. आयरन अकॅडमीमध्ये शिक्षकेतर कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. गेल्या 20 वर्षांपासून ते विद्यापीठाच्या सेवेत आहेत. सातार्‍यासह विटा, मुंबई, पुणे आदी ठिकाणीही त्यांनी सेवा बजावली आहे. त्यांचे वडिल अजिंक्यतारा साखर कारखान्याचे माजी संचालक आनंदराव परबती साबळे यांच्यापासूनच त्यांना समाजकार्याचा वसा आणि वारसा लाभला आहे. त्यांनी व सहकार, समाजकारणात विविध पदे भूषविली आहेत. 

त्यापासून प्रेरणा घेत जयवंत हेसुध्दा आपली नोकरी, शेती व्यवसाय सांभाळत समाजकार्यात सक्रिय असतात. त्यातूनच त्यांनी गावात वाचनालयही सुरू केले असून त्यात 765 हून अधिक पुस्तके आहेत. याशिवाय अभिनव जिज्ञासा सामाजिक संस्थेच्या माध्यमातूनही ते समाजसेवेचे धडे गिरवतात. आपल्या या सर्व धडपडीचे प्रेरणास्थान डॉ. पतंगराव कदम हेच असल्याचे ते नेहमी आवर्जून सांगतात. विद्यापीठात नोकरी लागण्याअगोदरपासूनच आपण साहेबांचे फॅन होतो. त्यांनी प्रतिकूलतेवर मात करीत शून्यातून विश्वनिर्मिती केली, त्यामुळे आपणास त्यांच्याविषयी सदैव अभिमान वाटतो. 

म्हणूनच ते हयात असताना त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला आणि आता त्यांच्या पश्चात जयंतीदिनी आपण रक्तदान करतो. स्वत:चा व मुलांचे वाढदिवस अशा शुभप्रसंगीही आवर्जून रक्तदान करतो. त्यातून आजवर 54 वेळा रक्तदान केल्याचेही श्री. साबळे यांनी लोकमंथनशी बोलताना सांगितले. याशिवाय कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत ओळखीच्या किंवा अनोळखी रूग्णांचे प्राण वाचविण्यासाठीही ते धावून जातात. आपल्या प्रेरणास्थानाप्रती आदर व्यक्त करण्यासाठी स्वत:च्या घरी अभिवादनाचे कार्यक्रम घेणारे जयवंत साबळेंसारखी व्यक्तीमत्त्वे दूर्मिळच असून या उपक्रमाबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केले.