Breaking News

पीएसआय परिक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल गणेश महाजन यांचे जंगी स्वागत


किनगाव राजा,(प्रतिनिधी): ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध नसतानाही सिंदखेड राजा  तालुक्यातील वाघजाई येथील गणेश पुंजारामआप्पा महाजन यांनी ओबीसी प्रवर्गातील 244 मार्क प्राप्त करून राज्यातून तिसरा क्रमांक मिळवला आहे. त्यांच्या मूळगावी वाघजाई येथे गावकर्‍यांच्या वतीने जंगी स्वागत करून त्यांची मिरवणूक काढण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार तोराराम कायंदे होते. तर प्रमुख पाहुणे किनगांव राजा पोलीस स्टेशनचे पीएसआय किशोर शेरकी, डिंगाबर हुशे, डॉ.सोमेश राजमाने डॉ.शिवानंद जायभाये आदीजण उपस्थित होते. यावेळी पीएसआय झालेले गणेश पुंजारामआप्पा महाजन यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पीएसआय परिक्षेत उत्तीर्ण गणेश महाजन यांनी सांगितले की, स्वत:वरील विश्‍वास, अपारकष्टाची तयारी आणि आई-वडिलांची साथ यामुळेच आपण या यशापर्यंत पोहचू शकल्याची भावना यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.शिवानंद जायभाये यांनी सांगितले की, स्पर्धा परीक्षांत यशस्वी होणे ग्रामीण भागातील मुलांना शक्य झाले ते फक्त स्वतः मध्ये अभ्यास करण्याची जिद्द असावी लागती. त्यांचप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या संदर्भातील गैरसमज आणि न्यूनगंड मनामधून काढून टाकून स्पर्धा परीक्षा देवून युवकांनी उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे सांगितले. प्रमुख पाहुणे किनगांव राजा पोलीस स्टेशनचे पीएसआय किशोर शेरकी यांनी सांगितले की, जिद्द आणि चिकाटी ठेवून अभ्यास केला तर यश नक्की मिळते असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार तोताराम कायंदे यांनी सांगितले की, प्रतिकूल परिस्थिती शिक्षणाची आवड निर्माण करते.

आयुष्यात कोणतीही गोष्ट जर करायची असेल तर त्यासाठी जिद्द, चिकाटी आणि प्रयत्न या तीन गोष्टींचा मेळ घातला पाहिजे. काही तरी करून  दाखवणार्‍या तरूणांनी नेहमी सकारात्मक आत्मविश्‍वास बाळगला पाहिजे, यश नक्की मिळेल असे सांगितले. यावेळी गणेश महाजन यांची गावातून मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील व गावांतील शेकडो युवक व नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय सानप यांनी केले तर आभार प्रदर्शन सुधाकर बोरुडे यांनी केले.