Breaking News

पाकिस्तान मोजतेय मृतदेह आणि काँग्रेस मागतेय पुरावाः मोदी


ओडिशा: पाकिस्तान अजूनही दहशतवाद्यांचे मृतदेह मोजतो आहे आणि ’हे’ एअर स्ट्राइकचा पुरावा मागत आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे, ओडिशातील कोरापट येथे मोदी यांनी आज सामान्यांना संबोधित केले.

आपल्या भाषणात काँग्रेसचा मोदींनी चांगलाच समाचार घेतला. ‘एअरस्ट्राइकला एक महिना उलटून गेला आहे. पाकिस्तान अजूनही मृतदेह मोजत बसले आहे आणि काँग्रेस एअरस्ट्राइकचा पुरावा मागते आहे. काँग्रेसने जवानांचा आणि शास्त्रज्ञांचा अपमान केला असून त्यांना योग्य प्रत्युत्तर द्यायलाच हवे,’ असे ते म्हणाले. गेल्या सात दशकांमध्ये काँग्रेसने गरिबांचा अपमान केला आणि आता ते सैन्याचा दिवसरात्र अपमान करत आहेत. त्यांना योग्य उत्तर द्यायलाच हवे, अशी टीका त्यांनी केली.

या वेळी मोदी यांनी ओडीशातील बिजू जनता दलावरही सडकून टीका केली. ओडिशात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संसाधने असतानाही बीजेडीमुळे या राज्याचा विकास होऊ शकला नाही. चिट फन्ड घोटाळा करणारे ओडिशाचा विकास करू शकतात? खाण माफियांना मदत करणारे आदिवासींचे हक्क हिरावणारे या राज्याचा विकास करू शकतात का, असे सवालही मोदी यांनी उपस्थितांना विचारले. यासोबतच मोदी यांनी केंद्र सरकारच्या उज्ज्वला आणि आयुष्मान भारत योजनेचे कौतुकही केले. लोकांना मजबूत सरकार हवे, की लाचार सरकार हवे, हा निर्णय सर्वस्वी त्यांचाच आहे असेही त्यांनी सांगितले. मोदी यांची ही ओडिशातील पहिली रॅली होती.