Breaking News

मल्लिकार्जुनेश्‍वराच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी


घोटण/प्रतिनिधी : शेवगाव तालुक्यातील घोटण व पंचक्रोशीतील गावांचे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुनेश्‍वराच्या महाशिवरात्र निमित्ताने मोठी गर्दी पाहावयास मिळाली. तालुक्याचे श्रद्धास्थान असणारे मल्लिकार्जूनेश्‍वराचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले होते. 

सोमवारी रात्री बारा वाजल्यापासूनच रूढी व परंपराने असणारे अभिषेक व देवाची महापूजा केली गेली. गावातील व परिसरातील भाविकांनी श्री क्षेत्र पैठण येथून गंगाजल आणून देवाला प्रथम अर्पण केले. अनेकांनी विधीप्रमाणे अभिषेक करून दर्शन देखील घेतले. सकाळी सहा वाजल्यापासूनच भक्तांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यानिमित्ताने घोटण गावकर्‍यांकडून भक्तांना खाण्यासाठी उपवासाचे पदार्थ तयार केले होते. तसेच विविध वस्तू विक्रेते देखील मोठ्या संख्येने आले होते. कुस्त्यांचा जंगी हंगामा देखील भरवण्यात आला. या ठिकाणी प्रशासनाच्यावतीने मोठा पोलिस बंदोबस्त देखील देण्यात आला.