Breaking News

कै. डॉ. पतंगराव कदमांनी माणुसपण जपले : जाधव


सातारा / प्रतिनिधी : दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांनी शून्यातून विश्व निर्माण करीत शिक्षणाची गंगा सर्वसामान्यांपर्यंत पोहोवली. शिक्षण, सहकार, समाजकारण आदी क्षेत्रांबरोबरच माणुसपण जपण्याचे अनोखे कार्य त्यांनी केले, असे मत मुख्याध्यापक धनंजय जाधव यांनी व्यक्त केले.

भारती विद्यापीठाच्या येथील डॉ. जे. डब्ल्यू. आयरन अकॅडमीमध्ये आयोजित डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रथम स्मृतीदिन कार्यक्रमात ते बोलत होते. स्वत: प्रतिकूल परिस्थितीशी झगडत डॉ. कदम यांनी शिक्षण घेतले व वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी विद्यापीठ स्थापून त्यांनी अनोखा विश्वविक्रम केला आहे. संस्था केवळ सुरू करून न थांबता त्याचा वटवृक्ष करण्यासाठी त्यांनी आपला देह चंदनापरी झिजवला. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच भारती विद्यापीठाच्या माध्यमातून अनेकांना ज्ञानार्जनाची संधी मिळाली असून पारंपरिक शिक्षणाच्या बरोबरीने व्यावसायिक उच्च शिक्षणाची कवाडे उघडणारे डॉ. कदम हे आधुनिक शिक्षणमहर्षीच होेते. त्यांच्या जाण्याने भारती परिवाराचे फार मोठे नुकसान झाले असले तरी, त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी प्रयत्नशील राहाणे, ही त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल.

शीतल साळुंखे यांनीही या वेळी डॉ. कदम यांच्या जीवनकार्यावर आधारीत भाषण केले. प्रस्ताविक व सूत्रसंचालन हेमा भाटीया यांनी केले. अरूंधती गुजर यांनी आभार मानले. या वेळी शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचार्‍यांसह प्राथमिक, माध्यमिक विभागातील विद्यार्थी, पालक उपस्थित होते.