Breaking News

वाचनामुळेच समाज घडतो - डॉ. आहेर


पारनेर/प्रतिनिधी: महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांनी लेखन वाचन मन लावून केले तर विद्यार्थी जीवनात यशस्वी होऊ शकतात. वाचनामुळेच वैचारीक दृष्टीकोन विकसित होतो. वाचनामुळेच समाज घडतो. असे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांनी म्हटले आहे.

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे, न्यू आर्टस् कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज, पारनेर येथे मराठी विभागातर्गत 20 व 21 फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय लेखन वाचन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य डॉ रंगनाथ आहेर, उपप्राचार्य डॉ.तुकाराम थोपटे व रसायनशास्त्र विभाग प्रमुख व अंतर्गत गुणवत्ता कक्ष संचालक डॉ.दिलिप ठुबे यांच्या हस्ते वृक्षाला पाणी घालून करण्यात आले.

या कार्यशाळेत पहिल्या सत्रात मार्गदर्शन करताना प्रा. राहुल पैठणकर यांनी विस्थापितांचे जग समजून घेताना प्रत्यक्ष त्यांना आलेले अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. आदिवासी, त्यांचे जीवन, राहणीमान, त्यांचा संघर्ष विद्यार्थ्यासमोर मांडला. प्रा.नंदकुमार उदार यांनी आमचा बाप आणि आम्ही या नरेंद्र जाधव यांच्या आत्मकथना विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

दुसर्‍या सत्रामध्ये प्रा.अतुल चौरे यांनी पद्मश्री पुरस्कार प्राप्त कवी नारायण सुर्वे यांची ओळख कवितेद्वारे विद्यार्थ्यांना करून दिली. काही प्रबोधनपर कविता त्यांनी विद्यार्थ्यांना गाऊन दाखवल्या. या कार्यशाळेसाठी प्रा. संजय गायकवाड, प्रा. राजेंद्र फलके, प्रा.ज्योत्सना म्हस्के, प्रा.अर्चना फुलारी, प्रा.संजय आहेर, प्रा.प्रतिक्षा तनपुरे, प्रा.शुभदा आरडे आदी उपस्थित होते.