Breaking News

संगमनेर बसस्थानक व्यापारी संकुलाच्या निर्माणात गैरव्यवहाराचा आरोप


संगमनेर/प्रतिनिधी: संगमनेर शहराचा चेहरा मोहरा बदलून विकासाची नवी ओळख बनलेल्या आणि संगमनेरकरांसह संपूर्ण राज्याचे कौतुकाचा विषय ठरलेल्या संगमनेर बसस्थानक व्यापारी संकुल निर्माणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप येथील काही सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनी केला आहे.

बसस्थानक ठेकेदाराकडून बसस्थानक व व्यापारी संकुलचे 5900 चौ.मी.चे बांधकाम करताना महसुलाची गौण खनिजाची (वाळू, मुरूम, खडी, दगड) कुठलीही परवानगी घेतली नाही. ठेकेदाराचे काम पूर्ण झाल्याचा कालावधी 7 जानेवारी 2019 रोजी संपलेला असल्यामुळे काम अपूर्ण असून सुद्धा पालिकेच्या अधिकारी यांच्याकडून राजकीय अथवा इतर मार्गाचा वापर करून काम पूर्णत्वाचा दाखला घेतलेला आहे.

नवीन संकुलात एकूण किती जुन्या टपरी धारकांचे पुनर्वसन करून गाळे देण्यात आले आहे? बसस्थानक परिसरातील रेडीरेकनर दर किती? करारामध्ये 8 हजार 600 रुपये हा दर चौ.मी. कशाचा आहे. याप्रमाणे गाळे दिले तर एक गाळा किती रुपयांचा होतो? हे सामान्य जनतेला ठेकेदाराने व परिवहन महामंडळाने जाहीर करावे, असे खताळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

संगमनेर नगरपालिकेने बसस्थानक बांधकाम काम पूर्ण झाल्याचा दाखला कुठलीही पाहणी, खात्री न करता दिला आहे. असे माहिती अधिकार कागदपत्रातून दिसून येत आहे. बांधकाम परवाना देताना ज्या अटी व नियमवलीला अनुसरून परवानगी दिली. त्याचे उल्लंघन झालेले असतानाही मुख्याधिकारी, बांधकाम अभियंता यांनी कुठलीही प्रत्येक्ष भेट न देता ठेकेदाराला भोगवट प्रमाणपत्र दिलेले आहे. 

यामध्ये महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवन उपाय योजना 2006 अन्वये ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले नाही. प्लिथं काम नगर परिषद इंजिनीयर तपासणी अहवाल घेतलेला नाही. बांधकाम नकाशा ढझ मंजूर प्रमाणे काम चालू आहे. का नाही याची शहनिशा पालिकेने केलेली नाही. लिफ्ट, गार्डन, पार्किंग, बगीचा, कंपाउंड वॉल यासह इतर कामे बाकी असताना मुख्याधिकारी यांनी काम पूर्ण झाल्याचा दाखला दिलाच कसा? यावेळी मुख्याधिकारी व बांधकाम अभियंता यांची मा.जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करून त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार आहे. आपला बसस्थाकाच्या माध्यमातून होत असलेल्या विकास कामाला विरोध नसून विकास कामाच्या नावाखाली झालेल्या भ्रष्टाचाराला विरोध आहे. असे खताळ यांनी आपल्या पत्रकातून म्हटले आहे.