Breaking News

विखे पाटील महाविद्यालयातील एक दिवसीय चर्चासत्र


प्रवरानगर/प्रतिनिधी : ज्ञानाचे रूपांतर आर्थिक संपत्तीमध्ये करण्याचे शहाणपण हे अनुभवातूनच येत असते. असे सांगताना राहता परिसरात मोठ्या प्रमाणावर असलेल्या डाळिंब पिकाच्या मुळावरील सूत्रकृमी आणि बुरशीवर अभ्यास करून प्रवरेत कृषी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ज्ञानार्जनाबरोबर अर्थार्जन साधताना शेतकर्‍यांनाही फायदा करून द्यावा. असे आवाहन पुणे येथील स्वस्ती अग्रोचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ.अभय शेंडे यांनी केले. 

प्रवरानगर येथील कृषी आणि कृषीसंलग्नित महाविद्यालयामध्ये पदमश्री विखे पाटील महाविद्यालयातील डिझाईन इनोव्हेशन सेंटरद्वारे आयोजित केलेल्या कृषी क्षेत्रातील व्यवसायाच्या संधी व समर इंटरशिप या विषयावर आयोजित केलेल्या एक दिवसीय चर्चासत्रामध्ये डॉ. अभय शेंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मार्गदर्शन केले. या प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिसर्चफाऊंडेशनचे समन्वयक प्रा. अविनाश जोशी गोपाळ श्रीवास्तव, अरुण आयोडकर, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कृषी संचालक डॉ. मधुकर खेतमाळस, पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ.प्रदीप दिघे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य निलेश दळे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य रोहित उंबरकर, प्रा. नितीन साळी, प्रा. किशोर माळी आदी मान्यवर उपस्थित होते.

 डॉ. अभय शेंडे म्हणाले की, पुस्तक हे ज्ञान देते परंतु ज्ञानाचे अर्थार्जनामध्ये रूपांतर करण्याचे खरे शहाणपण हे अनुभवातून येत असल्याने कृषी संलग्नित विषयामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपला व्यावसायिक दृष्टीकोन वाढविण्यासाठी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रशिक्षण आणि इंटरशिपच्या माध्यमातून अनुभव आणि अर्थार्जनासाठी प्रयत्न करावेत असा सल्ला त्यांनी दिला. कृषी महाविद्यालयातील प्रा.सारिका पुलाटे आणि डॉ. विशाल केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली संप्पन्न झालेल्या या चर्चासत्रासाठी कृषी, कृषी जैवतंत्रज्ञान आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.