Breaking News

माढयात भाजपाचा आयात उमेदवार करामत करेल का?सोलापूर : माढा मतदार संघातील राजकीय बलाबल पाहिले असता रणजितसिंह निंबाळकर यांना सध्या तरी अनुकुल वातावरण असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. त्यामुळे माढयातील लढाई प्रतिष्ठेची बनली असून आयात उमेदवार माढयात करामत करेल का? असा सवाल कार्यकर्ता करत आहे. या मतदार संघात एकूण सहा विधानसभा मतदार संघ येतात. माढा, करमाळा, माळशिरस, सांगोला, माण-खटाव व फलटण-कोरेगाव या विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे.


माढ्यातून राष्ट्रवादीचे बबनराव शिंदे हे आमदार आहेत. ते संजय शिंदे यांचे ज्येष्ठ बंधू आहेत. करमाळा हा संजयमामांचा स्वत:चा विधानसभा मतदार संघ आहे. येथे शिवसेनेचा आमदार असला तरी राष्ट्रवादीची ताकद सर्वाधिक आहे. पक्षांतर्गत फुटीमुळे येथे सेनेला विजयश्री मिळाली होती. सांगोला मतदार संघातून शेकापचे गणपतराव देशमुख आमदार असून त्यांचा राष्ट्रवादीकडे उघउ उघड कल आहे. माळशिरस मतदार संघात हणमंतराव डोळस हे राष्ट्रवादीचे आमदार असले तरी मोहिते-पाटलांचे कट्टर समर्थक आहेत. या मतदार संघात मोहिते-पाटील गटाचे वर्चस्व आहे.


सातारा जिल्ह्यातील फलटण- कोरेगाव मतदार संघात राष्ट्रवादीचे दीपक चव्हाण आमदार असले तरी ना. रामराजे नाईक निंबाळकर यांचाच या मतदार संघावर पगडा आहे तर माण-खटाव मतदार संघात काँग्रेसचे जयकुमार गोरे आमदार आहेत. आ. जयकुमार गोरे यांचा माण मतदार संघात प्रभाव आहे. आ. जयकुमार गोरे यांची ताकद महत्वाची आहे. ते कुणाला मदत करणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. या मतदार संघात आ. गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांचाही मोठा गट असून त्यांची भूमिकाही महत्वपूर्ण ठरणार आहे. याशिवाय भाजपचे मंत्री ना. सुभाष देशमुख, पालकमंत्री विजय देशमुख यांचीही लोकसभा मतदार संघात पकड आहे. काही प्रमाणात शिवसेनेचीही या मतदार संघात व्होट बँक आहे. या पार्श्‍वभूमीवर होत असलेली संजयमामा व रणजितसिंह ना. निंबाळकर यांच्यातील लढत लक्षवेधक ठरणार आहे.रणजितसिंह ना. निंबाळकर हे धडाडीचे व आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचा लोकसंग्रहही प्रचंड आहे. त्यांना भाजप-शिवसेनेची मिळालेली भक्कम साथ, मोहिते पाटील गटाची बांधणी यामुळे भाजपकडून त्यांच्या विजयाचा दावा केला जात आहे तर दुसरीकडे संजय शिंदे यांच्या विजयाचीही राष्ट्रवादी व काँग्रेसकडून गणिते मांडली जात आहेत. आता प्रत्यक्षात प्रचार काळात उडणारी रणधुमाळी, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी व फोडाफोडीचे राजकारण यामध्ये कोण बाजी मारणार? यावरच विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे स्पष्ट होणार आहे.