Breaking News

मॉडर्न चिल्ड्रन अकॅडमीच्या विज्ञान प्रदर्शनातून पाणी बचत व पर्यावरण संवर्धनाचा संदेश


अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील मॉडर्न चिल्ड्रन अकॅडमीच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पाणी बचत व पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन अकॅडमीच्या संचालिका जैबुनिसा हाशीम सय्यद यांच्या हस्ते झाले. यावेळी जावेद सय्यद, डॉ.राबिया सय्यद, मजहर खान, छाया पवार, जावेद सय्यद याकूब, प्राचार्या फैमिदा खान, आत्या सय्यद आदिंसह शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी सोलर सिस्टम, पवन चक्की, रेनवॉटर हार्वेस्टिंग, अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत, सेंद्रीय शेती, संगणक व गणित विषयावर विविध प्रकल्पे सादर केली होती. प्रदर्शन पहाण्यासाठी आलेल्या पालकांसह परिसरातील नागरिकांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कला-गुणांना दाद दिली.

जैबुनिसा हाशीम सय्यद म्हणाल्या की, भविष्यातील शास्त्रज्ञ घडविण्यासाठी लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजला पाहिजे. पर्यावरण संवर्धन व पाणी बचत ही काळाची गरज बनली असून, या विषयावर विद्यार्थ्यांनी साकारलेल्या प्रकल्पाचे त्यांनी कौतुक केले. डॉ.राबिया सय्यद यांनी विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना मिळणार असल्याची भावना व्यक्त केली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.