Breaking News

गोव्यात भाजपकडून लोकशाहीचा खून : डिमेलोपणजी : जनमत आपल्या विरोधात जात असून लोक मते देणार नाहीत, म्हणून भाजप आमदारांची चोरी करत आहे. यातून महाराष्ट्रवादी गोमंतक (मगो) पक्षाने धडा शिकावा. भाजपची ही कृती म्हणजे लोकशाहीचा खून असल्याचे मत गोवा प्रदेश काँग्रेस प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी व्यक्त केले.

चोर रात्रीच्या वेळीच किंमती सामानाची चोरी करत असतात. त्याचप्रकारे जनमत आपल्या विरोधात असल्याने मते मिळून उमेदवार जिंकून येऊ शकत नाही, म्हणून भाजप मध्यरात्री आपल्या सहकारी पक्षातील आमदार चोरत आहे. पक्षांतर बंदी कायद्यातून पळवाट शोधून अशाप्रकारे आमदार फोडले जात आहेत, ही लोकशाहीची शोकांतिका आहे. मगो हा भाजप आघाडी सरकारमधील घटक पक्ष असतानाच भाजपने त्यांचे दोन आमदार फोडले. यावरून मगोने धडा घेतला पाहिजे, असेही डिमेलो म्हणाले.

गोव्यात सत्तेसाठी सुरू असलेला घोडेबाजार पाहता येथे पोटनिवडणुकांचा वर्षाव होईल. त्याबरोबर स्वतःची पोळी भाजण्यासाठी सुरू असलेले पक्षांतर हा अनैतिकतेचा कळस आहे. त्याबरोबर गोव्यातील सरकार टिकवण्यासाठी केंद्र सरकारच्या आडून भाजप कोणत्याही स्तराला जाऊ शकते, असा आरोप गोवा सुरक्षा मंचचे प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केला. भाजप, मगो, काँग्रेस आदी पक्षांनी जनतेचा भ्रमनिरास केला आहे. केवळ आपल्या कौटुंबिक स्वार्थासाठी हे लोक राजकारण करत आहेत. अनैतिक पद्धतीने स्थापन करण्यात आलेल्या गोवा सरकारची पत गेलेली आहे. त्यामुळे दिवंगत मनोहर पर्रीकर यांची प्रतिमा वापरून सहानुभूती मिळविण्यासाठी त्यांच्या अस्थीदर्शन आणि विसर्जनाचा पक्षीय पातळीवर कार्यक्रम आयोजित केला गेला. परंतु, तो ’ फ्लॉफ शो’ ठरला, असेही वेलिंगकर म्हणाले. जेव्हा कला अकादमी येथे जनतेच्या अंत्यदर्शनासाठी पर्रीकर यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते तेव्हा लोकांना मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. याचा राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न पत गमावलेल्या भाजपने केला. मात्र, लोकांनीच याकडे पाठ फिरवली असल्याचे वेलिंगकर यांनी सांगितले. गोवा सुरक्षा मंचची पोटनिवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. मतदारांना कोणत्याही प्रकारचे आमिष न दाखवता लोकांपर्यंत पोहचत आहोत. त्याला प्रतिसाद मिळत आहे. तसेच लोकसभेच्या दोन्ही जागांवर उमेदवार उभे केले जाणार आहेत. उमेदवारांची नावे 31 मार्च रोजी जाहीर केली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकार कोसळणार : वेलिंगकर
गोव्यातील राजकीय स्थिती पाहता हे सरकार कोसळणार आहे. त्यामुळे राज्यातील 25 विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेशी युती ठेवणार का ? असेल विचारले असता शिवसेना आमचा मित्र पक्ष आहे. येथील स्थानिक कार्यकारिणीऐवजी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि गोवा प्रभारी संजय राऊत यांच्याशी चर्चा करणार असल्याचे वेलिंगकर यांनी नमूद केले.